धांदरफळच्या पाणंद रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास 

पालकमंत्री पानंद रस्ता अभियानातून धांदरफळ बुद्रुक परिसरातील रस्त्यांची पाहणी करताना प्रांताधिकारी भागवत डोईफोडे.

जिल्ह्यातील पहिले गाव : 10 पाणंद रस्ते झाले मोकळे

संगमनेर – शासनाच्या पालकमंत्री पाणंद रास्ता या अभियानाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्‍यातील धांदरफळ बु।। येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून श्रमदान करून गावातील अडचणीचे असलेले 10 पाणंद रस्ते मोकळे केले. असा उपक्रम राबविणारे धांदरफळ बु।। जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या गावात पाणी मुबलक असल्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतात पिकणारा शेतमाल ने आन करण्यासाठी शेतरस्त्यांची आवश्‍यकता होती, मात्र प्रवरा नदी लगत बैरबा मंदिर परिसरातील शेतजमीन ते प्रवरा नदी परिसरातील माळी समाज बांधवांची शेतजमीन कडे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे शेतातील शेतमाल ने-आण करण्यासाठी शेतातील बांधानेच नांगर, कुळव या शेतीच्या मशागतीच्या साहित्यासह भाजीपाल्यासारखी पिके अर्धा ते पाऊण किलोमीटर डोक्‍यावर वाहतूक करून शेताबाहेर आणावे लागत असे.

या भागातील शेतकऱ्याचा कित्येक वर्षे हाच दिनक्रम चालू होता. मात्र यातून शेतकऱ्यांची मुक्तता झाली पाहिजे ही बाब तंटामुक्तीचे अध्यक्ष तसेच स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांना शेतकऱ्यांना निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी हे रस्ते कोणत्याही परीस्थितीत मोकळेच करायचे असा मनाशी निश्चय केला, त्यांना परिसरातील शेतकऱ्यांनी तेवढ्याच हिंमतीने साथ दिली.

गावात अत्यंत अडचणीचे आणि अतिक्रमानात असणाऱ्या रस्त्याचा शोध घेतला. म्हसोबा मंदिर ते कारमाळा स्वामी समर्थ मंदिर ते कटवन माळा, मारुती शिंदे वस्ती ते मीनाक्षी बंगला रोड गोर्डे माळा, देशमुख शाळा त्रिंबकराव देशमुख दूध डेरी, श्रमिक दूध डेरी ते गोर्डे वस्ती, नाईकवाडी माळा वकील माळा परिसर रस्ता, रानमळा भैरवनाथ मंदिर प्रवरा नदी परिसर, खोल्या ओढा जावळी वस्ती बिरोबा मंदिर वकील फाटा, शेटे माळा मानस ढाबा रोड, देशमुख वस्ती ते वकील फाटा हे रस्ते अत्यंत अडचणीचे असल्याचे पुढे आले. त्यानंतर गावातील पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

परिसरातील सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रस्ते मोकळे करायचे ठरले. रस्त्यात शेती येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या सर्वे नंबरच्या दोन्ही बाजूने चार फूट मध्यावर आठ फुटाचा रस्ता करण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला, त्यास परिसरातील शेतकऱ्यांनी संमती दिली. समितीने त्या सर्व परिसराची पाहणी करून रस्ता कसा तयार करता येईल, याविषयी परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा केली. हा प्रस्ताव ग्रामपंचायतच्या मार्फत संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे व तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानंतर त्यांनी हे रस्ते पालकमंत्री पाणंद रस्ता अभियानाच्या माध्यमातून कसे तयार करता येईल याची पाहणी करण्याचे आदेश धांदरफळचे मंडलाधिकारी विवेक रासने, कामगार तलाठी मंगल डोईफोडे यांना दिले.

“वर्षानुवर्षे समाजाच्या वादामुळे श्रमिक दूध डेअरी ते गोर्डे वस्ती या रस्त्याच्या अनेक वेळा मोजण्या झाल्या, मात्र वादामुळे रस्ता झाला नाही. मात्र नागरिकांना एकोप्या मुळे आज शेतातील रस्ता तयार झाला. त्यामुळे शेतमाल शेती अवजारे आणि दूध ने आन करण्यासाठी जी आमची परवड होत होती ती कायमस्वरूपी थांबली.
-अनिल वाकचौरे , शेतकरी गोर्डे मळा

“रानमळा परिसरातील शेतातील शेतमाल डोक्‍यावरून वाहून आणावा लागत होता. मात्र पालकमंत्री पाणंद रास्ता योजनेतून आमचा रस्ता तयार झाला. आता आमचा शेतमाल डोक्‍यावरून न आणता ट्रॅकटर आणि बैलगाडीने आणता येऊ लागल्याने आमची अनेक दिवसाची परवड थांबली आहे.
– विलास शिंदे शेतकरी

सरपंच भानुदास शेटे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब देशमाने, अनिल काळे, बीट जमादार बाळू हांडे, पोलीस पाटील बाळासाहेब खरात, ग्रामविकास अधिकारी अशोक वर्पे यांनी पानंद रस्त्याबाबत शेतकरी बांधवांची बैठक घेतली त्यावेळी रस्ता तयार करताना कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. याबाबतची आम्ही दक्षता घेऊ असे कमिटीला सांगितले

गावच्या परिसरातील वरील दहा रस्ते अतिक्रमणमुक्त करून कच्चे रस्ते तयार करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकारी भागवत डोईफोडे तसेच तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे ग्रामपंचायत मार्फत देण्यात आला. पुढील कामाचे नियोजन करून शेतकरी बांधव महसूल यंत्रणा यांच्या मदतीने परिसरातील जमीनीची मोजणी केली त्यानंतर तत्काळ खुणा निश्चित करून जेसीपीच्या साह्याने भराव टाकण्याचे काम सुरू केले. शेतकऱ्यांनी यंत्र सामग्री देत स्वत: श्रमदान केले आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून रस्ते तयार झाले.

प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, जि.प.सदस्य रामहरी कातोरे, इंद्रजित थोरात, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब देशमाने, सरपंच भानुदास शेटे, अनिल काळे, दत्ता कासार यांनी पाहणी केली. त्यानंतर तयार झालेल्या नवीन रस्त्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांची शेतमाल ने आन करण्याची व मशागतीच्या साहित्य नेण्यासाठी होणारी अडचण कायमस्वरूपी दूर झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)