पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

राहाता/ संगमनेर – गणेश विसर्जनावेळी पाण्यात पडलेल्या दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहाता व संगमनेर तालुक्‍यात घडली. राहाता तालुक्‍यातील पिंपळस येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. सागर रमेश कदम (वय 24) असे या तरुणाचे नाव आहे.

रविवारी गणपती विसर्जनाच्या दिवशी सागर कदम व त्याच्याबरोबर इयत्ता 5 वीत असलेला निशांत कदम हे दोघेजण त्यांच्या घरातील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निरगुडे वस्तीजवळील कातनाल्यानजीकच्या तळयात गेले. सागरचा तोल गेल्याने तलावाच्या कडेला असलेल्या वीस फूट खोल गाळात तो पडला. तळयात पाणी जास्त असल्याने व गाळ जास्त प्रमाणात असल्याने तो गाळात फसला. त्याला पडलेला पाहून त्याच्याबरोबरच्या निशांतने शेजारी असलेल्या लोकांना मदतीसाठी बोलाविले. तेथे असलेल्यांनी साडयांचे पदर व दोर सोडले; परंतु गाळ जास्त प्रमाणात असल्याने तो पाण्यात बुडाला. त्याचा मृतदेह एक तासाने नागरिकांनी शोधून काढला. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर रात्री साडेअकरा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संगमनेर शहरात रविवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना घुलेवाडी येथे राहणाऱ्या नीरज चंदूलाल जाधव (वय 28) या तरुणाचा प्रवरा नदीपात्रावर घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला असता दुर्दैवी मृत्यू झाला. नीरज हा कुटुंबासमवेत प्रवरा नदीवर घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला होता. गणपती विसर्जनासाठी नदीपात्रातील पाण्यात गेला असता वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला. आज सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अवैध वाळू वाहतुकीने प्रवरा नदीपात्रात झालेल्या मोठ्या खड्ड्यांमुळेच तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.

विवाहापूर्वीच सागरवर काळाचा घाला

सागर कदम याचा गुरूवारी साखरपुडा झाला होता. 18 डिसेंबर रोजी त्याचा विवाह होता. सागर हा त्याच्या कुटूंबीयांचा एकुलता एक मुलगा. गणपती विसर्जनापूर्वी सागरने अनेकांना सांगितले, की मी लगेच दहा मिनिटांत विसर्जन करून येतोच, असे म्हणून तो गेला व काळाने त्याच्यावर घाला घातला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)