घारगावात पुन्हा भूकंपाचा धक्का

2.5 रिश्‍टर स्केलची नोंद 

संगमनेर  – तालुक्‍यातील घारगावसह लगतच्या काही गावांमध्ये भूकंपाचे हादरे बसण्याचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी (दि.24) रात्री 9.18 वाजता पुन्हा एकदा भूगर्भातील हालचालीचा भूकंपाचा सौम्य धक्‍का जाणवला. नाशिक येथील भूकंपमापन यंत्रावर 2.5 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा हा धक्‍का असल्याचे भू-वैज्ञानिकांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घारगाव व परिसरातील काही गावांमध्ये मागील आठवड्यात शनिवारी (दि. 18) रात्री साडेदहाच्या सुमारासही जमिनीतून आवाज आल्याचे ग्रामस्थांना जाणवले. या धक्‍क्‍यांची कोणतीही नोंद नाशिकच्या भूकंपमापक यंत्रावर झाली नव्हती. त्यानंतर मंगळवारी (दि.21) सकाळी पुन्हा साडेआठ वाजण्याअगोदर ठराविक वेळेच्या अंतराने दोन धक्‍के घारगाव, आंबी खालसा, अकलापूर, खंदरमाळवाडी, माळेगाव पठार, कोठे खु., कोठे बु., माहुली, बोटा, या गावांमध्ये जाणवले.

या दोन धक्‍क्‍यांपैकी 8.22 वाजता 115 सेकंद बसलेल्या धक्‍क्‍याची तीव्रता 2.8 रिश्‍टर स्केल असल्याचे नाशिक येथील भूकंपमापन यंत्रात या धक्‍क्‍यांची नोंद झाली होती. मात्र शुक्रवारी रात्री 9.18 वाजता पुन्हा एकदा भूगर्भातील हालचालीचा एक भूकंपाचा सौम्य धक्‍का जाणवला.

नाशिक येथील भूकंपमापन यंत्रावर याची नोंद झाली आहे. 2.5 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा हा धक्‍का असल्याची व केंद्रबिंदू नाशिकच्या मेरी संस्थेपासून बोट्याचा दिशेने सुमारे 88 किलोमीटर असल्याची माहिती वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी दिली.

घारगाव परिसरात बसत असलेल्या धक्‍क्‍याच्या पार्श्‍वभूमीवर दुपारी अडीचच्या सुमारास संगमनेर प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसीलदार साहेबराव सोनावणे, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे आदींसह या भागातील नितीन आहेर, सुरेश आहेर, तलाठी, ग्रामसेवक, मंडलधिकारी यांच्या पथकाने घारगाव परिसरात भेट देवून पाहणी केली. घारगाव येथील भारत हायस्कूच्या एका कौलारू इमारतीस तडे गेले आहेत. या इमारतीत वर्ग न भरविण्याच्या सूचना हायस्कूल प्रशासनाला दिल्या आहेत. मागील वर्षी येथील शिक्षकांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या काळजी विषयी प्रशिक्षण देण्यात आले होते.

“पठार भागात भूगर्भातील हालचालीमुळे काही अंतरावर बसणारे धक्‍के सौम्य आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये. या भागाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी मेरी संस्थेचे भू-वैज्ञानिक येणार आहेत.
-साहेबराव सोनवणे, तहसीलदार, संगमनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)