संगमनेर : तालुक्यातून वाहणाऱ्या प्रवरा, म्हाळुंगी, आढळा आणि मुळा नद्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांचे फावले असून, रोज शेकडो ब्रास वाळू चोरटी वाहतूक केली जात आहे. रात्रीच्यावेळी बसस्थानक परिसरात काही पिकअप आणि ट्रॅक्टर उभे दिसल्याने तसेच त्याच ठिकाणी एका तलाठ्याचा कारकून पहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संगमनेर तालुक्यात संगमनेर खुर्द, निमज, खांडगाव, धांदरफळ, जोर्वे, पिंपरणे, राजापूर, साकुर, घारगाव यांसह अनेक गावातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जाते. महसूलकडून नेमण्यात आलेले पथक नावापुरते उरले असून ते काहीच काम अथवा कारवाई करत नसल्याचे दिसून येते. चढ्या भावाने सुरु असलेली वाळू तस्कर हे रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने गाड्या चालवतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव मुठीत धरून बाहेर चालावे लागते.
संगमनेर शहरातील बसस्थानक परिसर हा वाळू तस्करांसाठी सुरक्षित ‘हब’ बनला आहे. त्यामुळे यंत्रणेच्या निष्क्रीयतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरात वाळूच्या काही पिकअप थांबलेल्या दिसल्या. विशेष म्हणजे महसूल विभागातील काही कारकून आणि तलाठी यांचा या व्यवहाराला अभय असल्याचे बोलले जात आहे. बसस्थानक परिसरात तलाठ्यांच्या हाताखालील कर्मचारी वारंवार फेरी मारत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. आर्थिक मलिदा लाटण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
अनेक ठिकाणी नदीपात्र खोल झाल्याने आजूबाजूच्या भूभागावर भूगर्भातील पाण्याची पातळीही घटत चालली आहे. या अवैध वाळू उपशामुळे नद्यांचे नैसर्गिक स्वरूप बदलत असून पर्यावरणीय समतोल बिघडत आहे. यासोबतच शासनाच्या महसूलासही मोठा फटका बसत आहे. तरी प्रशासनाने त्वरित कारवाई करत वाळू माफियांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.