कोरड्या विहिरीतील 50 गणेशमूर्तींचे श्रीगोंद्यात फेरविसर्जन

श्रीगोंदे - कोरड्या विहिरीत विसर्जन केल्याने गणेश मूर्ती आहे. त्या स्थितीत होत्या. त्याबाहेर काढून पाणी असलेल्या विहिरीत संभाजी ब्रिगेड च्या वतीने फेरविसर्जन करण्यात आले. (छाया - अर्शद शेख)

संभाजी ब्रिगेडचा अनोखा उपक्रम

श्रीगोंदे – अनंत चतुर्दशीला शहरातील सार्वजनिक गणेश मूर्तींचे जेथे विसर्जन झाले ती विहिरच कोरडी होती. पाण्याअभावी विसर्जित न झालेल्या मुर्त्या आज पाण्याबाहेर काढण्यात आल्या व त्यांचे फेरविसर्जन केले गेले. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश बोरुडे यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी अशा विधायक प्रकारे साजरा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीगोंदा येथील सरकारी रुग्णालयाच्या पाठीमागील विहिरीत सर्व मूर्तींचे विसर्जन करण्याचे निश्‍चित झाले होते. त्यानुसार शहरातील सर्व गणेश मंडळांनी या ठिकाणी श्रीचे विसर्जन केले. ही विहिर कोरडी असल्याचे मात्र कोणाच्या ध्यानात आले नाही. पाणी नसलेल्या विहिरीत विसर्जन केल्याने मुर्त्या आहे.त्या स्थितीत राहिल्या. विसर्जन प्रसंगी रात्र अन्‌ अंधार असल्याने कार्यकर्ते याबाबतीत अज्ञानी राहिले.

दरम्यान ही बाब संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष अरविंद कापसे व अरविंद राऊत यांना समजली. त्यांनी आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विहिरीतील सर्व मुर्त्या नव्वद टक्के सुस्थितीत होत्या. ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश बोरुडे यांच्या वाढदिवसाची तयारी चालू होती. वाढदिवस न करता आपण या मूर्ती विहिरीतून बाहेर काढू व फेरविसर्जन करू, असा सल्ला त्यांना कापसे यांनी दिला.

गणेश विसर्जनसाठी जाहीर केलेली विहीर कुचकामी आहे, त्या ऐवजी अन्य पर्यायांचा विचार करावा असे आपण 30 ऑगस्ट रोजी पत्र देऊन नगरपालिका व पोलिसांना सुचविले होते. मात्र आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. ज्या गणेश भक्तांनी दहा दिवस मनोभावे श्री ची भक्ती केली, त्यांना कोरड्या विहिरीत विसर्जन करावे लागते हे दुर्दवी आहे. खंडोबा देवस्थान समोरील व धर्माधिकारी ज्वेलर्स यांच्या पाठीमागच्या सार्वजनिक विहिरीत विसर्जन शक्‍य होते. माझ्या पत्रात तशी मागणी असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हा गणेश भक्तांचा व श्री चा अपमान आहे. -अख्तर शेख माजी उपनगराध्यक्ष.

कार्यकर्ते लगेच कामाला लागले. विहिरीत उतरण्याचे धाडस कोणी करेना. अखेर स्वतः कापसे यांनी दोरखंडाच्या साह्याने विहिरीचा तळ गाठला. आतील एकेक मुर्ती सन्मानपूर्वक बाहेर काढण्यात आली. यात लहान मूर्ती पासून ते मानवी आकारा एवढ्या मुर्त्या होत्या. जमा झालेल्या मुर्त्या एका वाहनातून नेण्यात आल्या.पाणी असलेल्या विहिरीत त्यांचे फेरविसर्जन केले गेले.

या उपक्रमात माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख, अरविंद राऊत, गणेश अस्वर, गणेश पारे, कुमार लोखंडे, इरफान शेख, अजीज शेख, प्रवीण काळे आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)