क्षमता न पाहताच कोट्यवधींची कर्जे

शहर बॅंक घोटाळा : तारणावर बोजाचा उल्लेखच नाही; ४४ कोटींचा एनपीए

भागा वरखडे

बनावट सह्यांचे गुन्हेही दाखल होण्याची शक्‍यता

डॉ. शेळके यांनी बनावट सह्या करून हॉस्पिटलचे भाडेकरार करणे, बनावट सह्या करून बॅंकांत खाती उघडणे, खात्यातील रक्कम परस्पर पैसे काढणे या गंभीर बाबी सहकार खात्याच्या चौकशीत आढळल्या होत्या. या प्रकरणात गुन्हे दाखल होऊ शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर – नगरमधील शहर सहकारी बॅंकेने थकबाकीदारांनाही कोट्यवधींची कर्जे मंजूर केली. कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता न पाहताच कर्जे मंजूर केल्यामुळे ती अनुत्पादक मालमत्ता प्रकरणा (एनपीए) गेली. या कर्जाची रक्कम 44 कोटी रुपयांहून अधिक आहे.

नगर शहरात “अहमदनगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ (एम्स) हे अतिभव्य रुग्णालय बांधण्यात येणार होते. त्यासाठी डॉ. नीलेश शेळके यांनी पुढाकार घेतला होता. या रुग्णालयासाठी जिल्ह्यातील सहा डॉक्‍टरांकडून प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे नव्वद लाख रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर इतर डॉक्‍टर व व्यावसायिकांकडून सुमारे पाच कोटी रुपये जमा करण्यात आले. याशिवाय बांधकाम, यंत्रसामुग्रीसाठी डॉ. शेळके यांनी वेळोवेळी कर्ज उचलले. त्यांचे अगोदरचे कर्ज थकीत असताना त्यांना शहर सहकारी बॅंकेने वारंवार कर्ज दिले.

विशेष म्हणजे बॅंकेचे संस्थापक अर्थतज्ज्ञ, त्यांचा मुलगा सनदी लेखापाल, अनेक जण आर्थिक विषयाशी संबंधित असताना बॅंकेत अशी कर्जप्रकरणे मंजूर करून ती एनपीएत जाईपर्यंत वसुली न करण्याचा प्रकार म्हणजे नगरमध्ये अनेक मल्ल्या, नीरव मोदी, चोक्‍सी घडविण्याला उत्तेजन देण्यासारखे आहे.

डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्ज्वला कवडे, डॉ. विनोद श्रीखंडे यांच्या तक्रारीत साम्य आहे. त्यांनी वारंवार सहकार खात्याकडे तसेच रिझर्व्ह बॅंकेसह अन्य यंत्रणांकडे दाद मागितली होती. याचा अर्थ त्यांनी त्याअगोदर शहर सहकारी बॅंकेतही वारंवार पाठपुरावा केला होता. असे असताना संचालक व अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली उत्तरे व प्रत्येक वेळी डॉ. शेळके यांना पाठिशी घालण्याचा केलेला प्रकार पाहता अधिकारी, संचालक अन्य डॉ. शेळके यांच्यात संगनमत असावे, असे मानायला पुरेपूर जागा आहे.

डॉ. शेळके, डॉ. कवडे, डॉ. श्रीखंडे, डॉ. सिनारे, डॉ. सुजाता शेळके, विश्‍वास शेळके, निर्मल एजन्सी, साई सुजाता हॉस्पिटल, साईकृपा फौंडेशन अशा प्रकरणात शहर सहकारी बॅंकेने कर्जे दिली. त्यातील 12 कर्जे शेळके यांच्यांशी संबंधित आहे. या सर्व प्रकरणात 42 कोटी कर्ज मंजूर करण्यात आले. या बॅंकेचा एकूण एनपीए 96 कोटी 36 लाखांचा असून त्यापैकी निम्मी कर्जे ही डॉ. शेळके यांच्यांशी संबंधित असल्याने गैरव्यवहाराचा संशय बळावतो आहे.

कर्जाबाबत मशिनरी कोटेशनच्या तीस टक्के रक्कम बॅंकेकडे भरणा करून घेणे आवश्‍यक होते; कोटेशनप्रमाणे कर्ज वितरीत करण्यात आले. पुरवठादाराची अधिकृतता, वैध कालावधी आदी काहीही न पाहता कर्जाची विल्हेवाट लावण्यात आली. विमा, विनियोग दाखला, खरेदी पावत्या नसताना कर्ज मंजूर करून नंतर त्याची वसुलीही करण्यात आली नाही. विशेष म्हणजे कर्जदारांकडे अन्य वित्तीय संस्थांचे कर्ज आहे, की नाही, याची खातरजमा न करता कर्ज मंजूर करण्यात आले. तारणावर बोजाची नोंद केलेली नाही. कर्ज अदा करण्यासाठी कोणतेही पत्र घेतलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)