पुणे – नगर रस्त्यावरील येरवडा ते खराडीपर्यंतचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी बीआरटी काढण्याबरोबरच उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या कामांना सुरवात झाली आहे. त्यामुळे नगर रस्ता लवकरच शंभर टक्के सिग्नल मुक्त होणार असल्याचा दावा वडगाव शेरी मतदारसंघाचे ( Vadgaon Sheri Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी केला.
आमदार टिंगरे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी वडगाव शेरी भागात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार टिंगरे यांनी मतदारांशी संवाद साधत ही माहिती दिली. टिंगरे म्हणाले, की या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला होता. ही कोंडी सोडविण्यासाठी आपण सातत्याने पुढाकार घेतला आहे.
बीआरटी मार्गिकेमुळे अपघात आणि कोंडी वाढल्याने नागरिकांसह, परिसरातील उद्योग, व्यवसायांना त्याचा फटका बसत होता. त्यामुळे थेट विधिमंडळात आवाज उठवून आणि महापालिका, पोलिसांकडे पाठपुरावा करून येरवडा ते सोमनाथनगरपर्यंतची बीआरटी मार्गिका काढण्यासाठी लढा दिला. सोबतच या रस्त्यावर केंद्र शासनाच्या माध्यमातून शिरूर ते वाघोलीपर्यंत होणारा दुमजली उड्डाणपूल थेट रामवाडीपर्यंत आणण्यासाठी पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे आगामी काळात नगर रस्ता शंभर टक्के सिग्नलमुक्त होईल.
माजी नगरसेवक योगेश मुळीक, सुनीता गलांडे, संदीप जराड, ज्ञानेश्वर शिंदे, उषा कळमकर, सतीश म्हस्के, नारायण गलांडे, महेंद्र गलांडे, माजी सरंपंच भिकोबा गलांडे, संगम शंकर, मुकुंद गलांडे, महेश गलांडे, अनिल नवले, राकेश परदेशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी या वेळी उपस्थित होते.