नगर- पुणे रेल्वे कॉडलाईनचे काम पूर्ण

आता दौंडमध्ये जाणारा वेळ वाचणार 

नगर – नगर-पुणे रेल्वेमार्गावरील गाड्यांना दौंडमधून यावे लागत होते. तेथे लाइन बदलण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे अंतर कापण्यासाठी वेळ लागत होता. त्याचा वेळापत्रकावरही परिणाम होत होता. त्यावर उपाय म्हणून दौंडला न जाता काष्टीवरून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गाला जोडणारी कॉडलाइन (बायपास) टाकण्याचा उपाय पुढे आला. अलीकडेच त्याचे कामही सुरू झाले होते. ते आता पूर्ण झाले आहे. आता यामुळे नगर ते पुणे हे अंतर दोन तास पंधरा मिनिटांत कापले जाईल.

याशिवाय पुण्याहून उत्तरेकडे मनमाड मार्गे जाणाऱ्या गाड्याही यावरून जाणार असल्याने त्यांचाही वेळ वाचणार आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल होऊन आणखी काही गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात. यामुळे आता नगर-पुणे रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंग वधवा यांनी दिली. यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांचेही प्रयत्न सुरू असून प्रवाशांनी पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर नगर-पुणे रेल्वे सुरू करून नंतर पुढील निर्णय घ्यावा, असा उपायही त्यांनी सूचविला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.