आ. कर्डिलेंची सैतानी प्रवृत्ती संपविणार

गोविंद मोकाटे : पैसा अन्‌ दहशतीच्या राजकारणाला लोक वैतागले

नगर – सत्तेतून पैसा अन्‌ पैशातून सत्ता हेच नगर तालुक्‍यातील नेत्याने आजपर्यंत केले. आता त्यात दहशतीची भरत पडली आहे. अशा पद्धतीने राजकारण करणाऱ्या आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आता लोक वैतागले आहे. त्यांची सैतानी प्रवृत्ती लोकच आता संपवणार आहेत. त्यामुळे नगर तालुक्‍यासह राहुरी तालुक्‍यातील जनता त्यांना पर्याय शोधत आहेत. एकाने कारखान्याच्या माध्यमातून तर दुसऱ्याने दहशतीच्या जोरावर राहुरी तालुका भकास केला. त्या विरोधात उभे राहण्याची आपली तयारी असून पक्षाने संधी दिली, तर राहुरी मतदारसंघात इतिहास घडेल, असे मत पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्‍त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोकाटे यांनी दैनिक प्रभातच्या नूतन कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्या वेळी प्रभात टीमबरोबर त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, “”राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून माझ्या राजकारणाला सुरुवात झाली. पंचायत समिती सदस्य झालो. त्या माध्यमातून गणात विकासकामे केली; परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मला पक्षाने डावलले. जेऊर गटातून उमेदवारी दिली नाही, म्हणून शिवसेनेत गेलो. माझी मुलगी उमेदवार होती. अतिशय घाणेरडे राजकारण झाले.

बदनामी करण्यात आली; पण जनतेला विश्‍वास होता. या घाणेरड्या राजकारणाला भीक न घालता जनतेने मुलीला मतदान केले. अडीच हजार मतांनी ती निवडून आली. पैसा अन्‌ दहशतीच्या राजकारणाला आता लोक वैतागले असल्याचे चित्र त्यातून निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आ. कर्डिलेंना नगर तालुक्‍यासह राहुरीत एकही जागा मिळाली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना लोकांनी नाकारले आहे. आ. कर्डिलेंची विश्‍वासार्हता संपत आली आहे. त्यामुळे ते आता दहशतीचा वापर करू लागले आहेत.

“कर्डिले यांचा मतदारसंघात एकही ठोस काम नाही. ग्रामस्थांच्या मागणीवरून करण्यात आलेल्या रस्त्यांची कामेदेखील अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही रस्ते पाहिले, तर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे कळत नाही,” असे सांगून मोकाटे म्हणाले, की राहुरी तालुक्‍याची कामधेनू तनपुरे यांनी बंद पाडली. स्वतःचा खासगी कारखाना काढला. त्यामुळे आज तालुक्‍यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात बाहेरच्या तालुक्‍यातील लोकांनी सातत्याने राहुरीत लक्ष घातल्याने या तालुक्‍याचे वाटोळे झाले आहे. आ. कर्डिले यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. हे आता लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे लोक आता आ. कर्डिले यांना कंटाळले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना टाळले.

जेऊरमध्ये साडेपाच कोटीचे आरोग्य केंद्र

जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था दयनीय झाली होती. या गावासह जवळपासच्या 12 ते 13 गावातील गोरगरीब रुग्णांसाठी हे एकमेव सरकारी रुग्णालय पण इमारतीची दुर्दशा झाल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत होते. त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्यामुळे पाठपुरावा करून थेट मंत्रालयातूनच या आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आता लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

धार्मिकतेबराबर सामाजिक कामे

पुण्यात बांधकाम व्यवसाय म्हणून काम करतो. त्यातून मिळणारे पैसे हे धार्मिकतेबरोबर सामाजिक कामांसाठी खर्च केला जातो. अनेक गावांमधील सप्ताहांना देणगी देतो. त्याबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळांसह विविध विकासकामांनादेखील आर्थिक मदत केली आहे. 17 लाख रुपयांचा धनगरवाडीत बंधारा, जेऊरमध्ये 17 लाखांचा बंधारा, ससेवाडीत 15 लाख, बहिरवाडीत 4 लाख तर इमामपूरमध्ये 15 लाख रुपयांचा बंधारे उभारले आहेत. आगडगावमध्ये सभामंडपासाठी 10 लाख, सात्रळ येथील जिल्हा परिषद शाळेला पाच लाख रुपयांचे मुलीचे वसतिगृह निधी दिली आहे.

शाळा झाल्या डिजिटल

जेऊर परिसरातील सर्व शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. त्यासाठी जातीने लक्ष दिले असून आवश्‍यक ते साहित्य उपलब्ध करून शाळा डिजिटल केल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थी संगणक शिकत असून जगाची ओळख त्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून करून दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)