वृक्षतोड करणाऱ्यांना वनविभागाचा आशीर्वाद!

बाबासाहेब गर्जे

सरकारच्या उद्दिष्टाशी विसंगत कृत्य; तोडीला दोन महिने उलटूनही कारवाईस टाळाटाळ

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाथर्डी – तालुक्‍यातील खेर्डे शिवारातील वनविभागाच्या जमिनीतील सुमारे 35 ते 40 वर्षे वयाची निलगिरी, सुबाभूळ व काशीद अशी 28 झाडे तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेला दोन महिने उलटूनही वन विभागाकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

एकीकडे शासनाकडून 13 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टांचा गवगवा केला जात असतानाच दुसरीकडे मात्र पाथर्डी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून शासनाच्या वृक्षलागवड व संवर्धन धोरणाला हरताळ फासला जात आहे. या घटनेनंतर आर्थिक लोभासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वृक्षतोडीला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप खेर्डे ग्रामस्तांकडून केला जात आहे. खेर्डे येथील नागरिकांनी ग्रामसभेत ठराव करून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“वनविभागाच्या हद्दीतील झाडे तोडण्याचा प्रकार होऊन दोन महिने उलटले, तरी वनविभाग गप्प का आहे, हे कोडे समजायला तयार नाही. हे गौडबंगाल आर्थिक उलाढालीतून घडलेले आहे. एकीकडे 13 कोटी वृक्ष लागवडीच्या जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करणारे अधिकारी या प्रकरणावर गप्प आहेत. या घटनेबाबत सखोल माहिती घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली जाणार आहे.
-अरविंद सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडी

“शासन गेल्या पाच वर्षांपासून कोट्यवधी रुपये वृक्ष लागवडीवर खर्च करत आहे; मात्र पाथर्डी तालुक्‍यात वनविभागाकडून आर्थिक लोभासाठी वृक्षतोड करणाऱ्या तस्करांना संरक्षण देऊन प्रोत्साहन दिले जात आहे. खेर्डे शिवारातील वनखात्याच्या हद्दीतील वृक्षतोडी संदर्भात वन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करावी. अन्यथा, संबंधित प्रकरणाबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल.
– किसन अव्हाड, संयोजक, आम आदमी पार्टी

“गेल्या 35 वर्षांपासून वनखात्याच्या हद्दीतील झाडांचा आम्ही सांभाळ करत आहोत. डोक्‍यावर पाणी घालून आम्ही ग्रामस्थांनी झाडे मोठे केलेली आहेत; मात्र झाडे सांभाळ करण्याची जबाबदारी असलेले वनविभागाचे अधिकारी आर्थिक लोभापायी झाडांचा कर्दनकाळ बनले आहेत. संबंधित प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव केला आहे. या प्रकरणातील दोषीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू.
– रघुनाथ सांगळे, माजी सरपंच, खेर्डे

खेर्डे शिवाराला लागून वनखात्याची जमीन आहे. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने वनविभागाच्या या जमिनीत निलगिरी, सुबाभूळ व काशीद अशी झाडे लावून त्यांचे तीन वर्षे संगोपन केले. तीन वर्षे वयाची मोठी झालेली झाडे सांभाळण्यासाठी खेर्डे ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली. गेली 35 वर्षे ग्रामपंचायतीने या झाडांचा पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ करून मोठी केली आहेत. गावातील प्रत्येकाला या झाडाविषयी प्रेम व आपुलकी आहे. 26 जून 2018 रोजी वनखात्याच्या जमिनीलगत असणाऱ्या शेती मालकांनी वनविभागाच्या हद्दीतील निलगिरी, सुबाभूळ व काशीद अशी 28 झाडे मशिनच्या साह्याने तोडली. झाडे तोडू नयेत, म्हणून ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला.

या घटनेनंतर वनविभागाच्या कार्यालयात व सामाजिक वनीकरण विभागाला प्रत्यक्ष जाऊन कळवले. सध्या या झाडाचे संरक्षण करणे, हे वनविभागाचे काम असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाकडून सांगण्यात आले. वनाधिकारी शिरीष निर्भवणे यांना संबंधित घटनेची माहिती लेखी व तोंडी कळवूनही वनविभागाकडून अद्यापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.

ग्रामस्थांनी या घटनेसंदर्भात पाथर्डी नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याविरोधात तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनाम्याचे आदेश दिले. मंडल अधिकारी व तलाठ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जावून तोडलेल्या झाडांचा पंचनामा केला आहे. तोडलेली झाडे सध्या वन खात्याच्या जमिनीत पडून आहेत.

वन विभागाकडून मात्र तस्करांना पाठिशी घातल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित अधिकारी आर्थिक तडजोडीतून प्रकरण दडपण्याच्या नादात शासकीय उद्दिष्ट व आपले कर्तव्य विसरल्याचे समोर येत आहे. या घटनेसंदर्भात खेर्डे ग्रामस्थांनी वनविभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)