भटक्‍या जातीत समावेशाची कासार समाजाची मागणी

पाथर्डी -कासार समाज हा भटकंती करून उदरनिर्वाह करणारा समाज आहे. या समाजाचा भटक्‍या जातीमध्ये समावेश करावा, अशी मागणी कासार समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. कासार समाज बागंडी व भांडी विकतो. त्यासाठी दारोदार भटकंती करतो. लोकसंख्येचा विचार करता हा समाज अल्पसंख्याक आहे. या समाजाचा भटक्‍या जाती (ब) मध्ये समावेश करणे आवश्‍यक आहे.

नेहमीच आर्थिक अडचणीत असल्याने शैक्षणिक शुल्क भरता येत नाही. देशाची लोकसंख्या 134 कोटींच्या वर असताना कासार समाजाची लोकसंख्या अवघी 0.02% म्हणजे दोन लाख 68 हजारदेखील नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी 1931 मध्ये केलेल्या जातनिहाय जनगणनेच्या आधारे तसेच केंद्र सरकारच्या 1951 च्या पहिल्या मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालात अतिमागास जातींमध्ये कासार जातीचा उल्लेख आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भांडी व बांगड्या बनवणे आणि विकणे अशी ओळख असलेला हा समाज विविध राज्यांत कासार, कंचारी, कसेरा, ठठेरा, कैसरवाणी, तमेरा, बुगरी, काचारी, कंसारा, ओतारी, ओतनकार, तांबटकार अशा विविध नावांनी ओळखला जातो, असे या समाजाच्या निवेदनात म्हटले आहे. अतिशय अल्प असलेला हा समाज राज्यात सोमवंशी क्षत्रिय कासार, जैन कासार, वऱ्हाडी कासार, तांबट कासार अशा पोटजातीत विभागला गेला आहे.

राज्यभर हा समाज विखुरलेला असल्याने या समाजाच्या हलाखीच्या अवस्थेकडे राज्यकर्त्यांचे कधी लक्षच गेले नाही. पोटापाण्यासाठी सतत भटकंती करावी लागत असलेला हा समाज गेल्या चाळीस वर्षांपासून भटक्‍या जाती-ब वर्गामध्ये समावेश व्हावा, म्हणून शासन दरबारी झगडत आहे. ज्यांना या विषयातील कायदेशीर ज्ञान होते अशी एक पिढीच काळाच्या आड गेल्याने 1981, 1996 नंतर हा लढा थंडावला होता.

कासार समाजाप्रमाणेच धातू वितळवून देवाच्या मूर्त्या, घंट्या, भांडी बनवून गावोगावी विकणारा ओतारी समाज शासनाने भटक्‍या जाती (ब) या प्रवर्गात समाविष्ट केला; मात्र कासार समाज आजही इतर मागासवर्गीयात आहे. भांडी व बांगड्या बनवणे व विकणे या परंपरागत व्यवसायात अनेक दुसऱ्या समाजातील भांडवलदार वर्गाने बस्तान बसवल्याने व्यवसायातही पिछेहाट आणि सरकारी नोकरीपासून ही वंचित अशा दयनिय अवस्थेतून समाजबांधव जात आहेत, असे कासार समाजाने म्हटले आहे. राज्यभरातील कासार समाजाने तहसीलदार प्रांत व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या वेळी कासार समाज पाथर्डी तालुकाध्यक्ष सुधीर कोळपकर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश रासने, तालुका युवा अध्यक्ष गौरव पाथरकर, खरवंडी सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनील अंदुरे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील, भास्कर अंदुरे, भाऊसाहेब अंदुरे, सुनील पाथरकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)