खेड ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन तळागाळातील आणि अडीअडचणीतील नागरिकांना सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यमार्गावर चौकाचौकात बंद पडत असलेल्या लालपरीला धक्का देताना अनेकवेळा चित्र दिसून येत आहे. खेड (ता.कर्जत) येथील मुख्य चौकातही करमाळा आगाराच्या लालपरीला धक्का देण्याची वेळ प्रवाशी व नागरिकांवर आली.
मुळात शाळकरी विद्यार्थ्यांना कायमच वाट पहायला लावणारी आणि निघतानाच गर्दीने ठप्प असणाऱ्या लालपरीवर सर्वजण नाराज आहेत. कोणत्याही क्षणी आणि कुठेही बंद पडून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अशा नादुरुस्त भंगार बस गाड्यांमुळे प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला अनेकदा धोका निर्माण झाल्याचेही प्रसंग समोर आलेले आहेत. मागील वर्षी भंगार अवस्थेमुळे बंद पडलेली बस येथील राज्यमार्गावर लोकनायक शाळेलगत लावण्यात आली होती. याबंद पडलेल्या व रस्त्यात उभा असलेल्या बसचा अंदाज न आल्याने खेड येथील महिलेला आपल्या जीवाला मुकावे लागले होते.
असे असले तरी अशा भंगार गाड्यांना अद्यापही धोका पत्करून रस्त्यावर धावण्यास भाग पाडले जाते. प्रवाशी आपला जीव मुठीत घेऊन रामभरोसे असा प्रवास करतात. त्यातच अनेक लाडक्या बहिणी आणि वयोवृद्ध महिलांना प्रवासात सवलत असल्याने या गाड्या गर्दीने खचाखच भरलेल्या असतात. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्याचे यात शैक्षणिक नुकसान होत आहे. परिवहन मंडळाच्या बेजबाबदार कारभारामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. राज्य परिवहन मंडळाला लागलेल्या नादुरुस्त बस गाड्यांचे ग्रहण केव्हा सुटणार? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार?
खेड येथून कर्जत, भिगवण, बारामती शहरांत शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी जातात. या प्रवासासाठी त्यांच्याकडे पास देखील आहेत. मात्र, अनेकवेळा बस थांब्यावर उभाच राहत नाहीत. यामुळे मोठे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत आ.रोहित पवार व आ. राम शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही.