अहमदनगर : आता तालुकास्तरावरच ऑक्सीजन, व्हेंटीलेटर बेड्स वाढवा

जिल्ह्यातील करोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा घेतला आढावा

नगर : पुढील 10 दिवसांत संभाव्य रुग्णसंख्या वाढ लक्षात घेऊन किमान 1 हजार ऑक्सीजन बेड्सची उपलब्धता वाढवा. त्यासोबत तालुकास्तरावरच ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेडची संख्या वाढविण्यासाठी गतीमान हालचाली करा. रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरणार्‍यांची अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्यासाठी कीटस् उपलब्ध करुन देण्यात येतील, अशा विविध सूचना व आदेश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज दिल्या .

कोरोनाचा नगर जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा आज विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

रेमडेसीविरची उपलब्धता आणि वितरण, लसीकरण मोहीम, आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टीजेन चाचण्यांचे तालुकानिहाय प्रमाण, रुग्णबाधित होण्याचे प्रमाण, याबाबत गमे यांनी तपशीलवार माहिती घेतली. जिल्हाधिकारी भोसले यांनी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका क्षेत्र, जिल्ह्याचा इतर नागरी भाग तसेच ग्रामीण भागातील उपाययोजना आणि प्रतिबंधक कार्यवाहीची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.

विभागीय आयुक्तांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील प्रांताधिकारी आणि तहसीलदारांशी संवाद साधला. त्याठिकाणी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. तालुकापातळीवरील आरोग्यसेवा बळकट केल्या, तर जिल्हापातळीवरील ताण काही प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकेल, तसेच तालुकापातळीवरच उपचार मिळाल्याने रुग्ण लवकर बरे होतील. त्यादृष्टीने ऑक्सीजन बेडस आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता वाढविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.