नगर : ‘पंतप्रधान किसान’ योजनेसाठी लगीनघाई

नगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जलदपणे शेतकऱ्यांर्पयत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाची लगीनघाई सुरू झाली आहे. सात ते 15 फेब्रुवारी या कालावधीत गावोगावी विशेष मोहीम राबवून पात्र शेतकऱ्यांची युद्धपातळीवर माहिती संकलित करण्यात येत आहे.

प्राथमिक यादी प्रसिद्ध करून हरकती, सुनावणीसह दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 21 फेब्रुवारी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारच्या बेव पोर्टलवर समाविष्ट (अपलोड) केली जाईल. दुष्काळ, लोकसभा निवडणूक आदी कामांत व्यस्त असणाऱ्या प्रशासनावर विविध अटींचा अंतर्भाव असणाऱ्या पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांची अल्पावधीत निवड करण्याची जबाबदारी आली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी स्वतः जातीने लक्ष देत आहे. या संदर्भात गावोगावी दवंडीद्वारे माहिती देण्यात येईल.

तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, विकास सोसायटीचे सचिव यांच्यामार्फत प्रत्येक गावातून योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती संकलीत केली जाणार आहे. मोहिमेतील दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला जाईल. जिल्ह्यात 11 तालुक्‍यात दुष्काळ असून त्याकरिता प्रशासनाकडे आधीच उपरोक्त भागातील शेतकरी कुटुंबांची माहिती आहे. याशिवाय सात-बारा संगणकीकरण, इतर शासकीय योजनांचे लाभार्थी यांची यादी प्रशासनाकडे उपलब्ध आहे. त्याचा उपयोग या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार होणार आहे.

पंतप्रधान किसान योजनेत दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या कुटुंबाला (पती, पत्नी आणि 18 वर्षीय मुलगा) वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात मिळतील. जिल्हा प्रशासनाने ज्यांचे वनपट्टे मंजूर केले आहे, त्या वनपट्टेधारकांना लाभ मिळणार आहे. सामाईक क्षेत्र धारण करणाऱ्या कुटुंबांच्या प्रकरणात ज्यांची आणेवारी निश्‍चित झाली आहे, त्यांचा विचार होईल. ज्यांची निश्‍चित नाही ते वगळले जातील.

शासकीय सेवेत ड वर्ग वगळता इतरांना लाभ मिळणार नाही. प्राप्तीकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.ज्या खातेदार अर्थात कुटुंबाची दोन हेक्‍टरपेक्षा कमी शेतजमीन आहे, त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल. संबंधितांनी भ्रमणध्वनी क्रमांक, बॅंक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांकाची माहिती स्थानिक तलाठ्याकडे तातडीने द्यावी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)