भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका

शेवगाव : येथील मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या बैठकीत बोलतांना प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे. 

ईश्‍वर बाळबुधे : शेवगावमध्ये राष्ट्रवादी ओबीसी सेलची बैठक

शेवगाव – भूलथापा व घोषणाबाज भाजपचे सरकार आहे. त्यामुळे बलुतेदारांनी पेटून उठायची वेळ आली आहे. भिमा कोरेगावमध्ये जातीय दंगल पेटविणारे मात्र मोकाट आहेत. आज आरक्षणाचा प्रश्‍न लोबकळत ठेवला असून मुख्यमंत्र्यांनी ओबीसीची 500 कोटींची शिष्यवृत्ती सवलत 50 कोटी केली आहे. विरोधक केवळ भावनेशी खेळतात. मोक्‍याच्या वेळी काहीतरी नविन पिल्लू काढतात आणि जनतेला भुरळ पाडतात. मात्र यावेळी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांनी येथे केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेवगाव येथील मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या आढावा बैठकीत बाळबुधे बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सचिन औटे, बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लांडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, सेलचे तालुकाध्यक्ष संदीप बडे, संजय फडके, राम अंधारे, अशोक डाके, ईश्वर गुणवंत, नंदु मुंढे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र ढमढेरे, विष्णुपंत बोडखे आदी प्रमुख उपस्थित होते.

बाळबुधे म्हणाले, नरेंद्र मोदींची सहानुभुतीची लाट आता संपली आहे. भाजपने भुलथापा मारुन सत्ता हस्तगत केली. हे आता उघड झाले आहे. मंडल आयोगासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. तर या आयोगाला शिवसेनेने विरोध केला म्हणून छगन भुजबळांनीही सत्तेचा त्याग केला. शिक्षणाच्या सवलतीसह मंडल आयोग लागू करण्यासाठी शरद पवारांनी योगदान देवून सर्व प्रथम मंडल आयोग महाराष्ट्रात लागू केला. म्हणूनच सर्व सामान्य, बारा बलुतेदार पवारांसोबत आहेत.

भाजपच्या भुलथापा व घोषणाबाजी उघड झाल्याने सत्ता परिवर्तन घडू लागले आहे. गडकरींच्या स्वत:च्या गावात तसेच त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातही त्यांना जनतेने झिडकारले आहे. तेथे 21 पैकी 16 ग्रामपंचायती कॉंग्रेसने तर मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे. क्षितीज घुले यांनी विरोधक भावनेशी खेळतात. येथे आणेवारी अधिक लावली. तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी नाही. बोंडअळीची नुकसान भरपाई सर्वाना मिळाली नाही. हुमणीच्या बाधीत क्षेत्राचे अद्याप पंचनामे झाले नाहीत अशी टिका त्यांनी केली.

यावेळी सुखदेव मर्दाने, संतोष जाधव, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद शिंदे, बाबुलाल भाई पटेल, भास्कर खेडकर यांची ही भाषणे झाली. बहुतेक वक्‍त्यांनी आरक्षणाचे वारे नसतांना लोकनेते स्व. मारुतराव घुले यांनी पंचायत समितीचे सभापतीपदी, गावचे सरपंचपदी तसेच इतर संस्थांमध्ये विविध घटकांची वर्णी लावली होती. तोच पायंडा घुले बंधुही अनुसरत असल्याचा उल्लेख केला. यावेळी सुखदेव मर्दाने ओबीसी सेलचे जिल्हा ग्रामीण प्रवक्‍ता तर सोमनाथ वाघ यांना शेवगांव तालुका सेलच्या संघटक पदी नियुक्‍तीचे पत्रे प्रदान करण्यात आली. सुत्रसंचालन कैलास जाधव यांनी केले. तर बाजार समितीचे संचालक बप्पासाहेब लांडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)