दुष्काळामुळे पशुधनाच्या किमतीत 25 टक्‍क्‍यांनी घट

चारा-पाणी नसल्यामुळे पशुधन आले बाजारात; कसाईच झाले आहेत ग्राहक

जामखेड – दुष्काळाच्या फटक्‍यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना विक्री करताना चांगला दर मिळणेही अशक्‍य झाले आहे. पशुधनाच्या किमतीत सुमारे 25 ते 30 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. जनावरे विकावे, तर किंमत कमी आणि सांभाळावी तर चारा व पाणी नाही, अशा दुहेरी कोंडीत शेतकरी सापडले आहेत. आता वासरेही विकण्यासाठी जामखेडच्या शनिवारच्या आठवडे बाजारात शेतकरी आणत आहेत. आताच चारा, पाण्याची व्यवस्था न झाल्यास आगामी काळात शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

दुष्काळीचा दाहकता आता हळुहळु वाढण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. घागरभर पाणी मिळवण्यासाठी लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. यासोबत जनावरांचाही प्रश्न ऐरणीवर आला असुन, त्याप्रमाणे पशुपालक शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. त्यांचा धीर सुटत चालला आहे. अनेकांनी जनावरे बाजारात विक्रीसाठी उतरवली आहेत. मोठ्या जनावरांसह लहान वासरेही विक्रीसाठी आणली जात आहेत.

शेतकऱ्यांना दुहेरी संकटांना तोंड द्यावे लागत आहे. एकतर चारा व पाण्याची तजवीज होत नसल्यामुळे शेतकरी जनावरे विक्रीसाठी काढत आहेत. दुसरीकडे विकत घेण्यासाठी ग्राहकच नसल्यामुळे किंमती कमी होत आहेत. प्रत्येक जनावरामागे 25 ते 30 टक्‍क्‍यांनी दर कमी होत आहेत. विकत घेण्यासाठी अन्य शेतकरी धजावत नाहीत. कारण त्यांच्यासमोर विक्री करणाऱ्यांप्रमाणेच समस्या आहेत.

चारा तर उपलब्ध नाहीच मात्र पाण्याचाही प्रश्न आहे. माणसांना पाणी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तेव्हा जनावरांना पाणी कोठून मिळणार हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे विहिरी, कूपनलिका आटल्या आहेत. पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. तेव्हा जनावरांसाठी पाणी उपलब्ध करण्याची शेतकऱ्यांची सक्षमता नाही. यामुळे जनावरांना बाजारचा रस्ता दाखविण्याशिवाय कोणताही पर्याय शेतकऱ्यांना दिसत नाही. यामुळे शासनाने उपाययोजना सुरू करण्याची गरज आहे.

“जनावरे संभाळण्याची शेतकऱ्यांची क्षमता आता संपत आहे. यामुळे वासरासह सर्वच जनावरे बाजारात आणावी लागत आहेत. शासनाकडून चारा व पाण्याची व्यवस्था होण्यास विलंब होत आहे. केवळ घोषणाबाजी सुरू आहे. प्रत्यक्षात उपाययोजना करण्यासाठी कृती काहीच होताना दिसत नाही.
– ज्ञानोबा गायकवाड, पशुपालक

Leave A Reply

Your email address will not be published.