राजकीय कविता – मतदाराजाला हवे तितके वाढू

आता सगळेच राजकीय नेते
खरेदी करतील खादीचा तागा
निवडणुका फारच जवळ आल्या
कार्यकर्त्यांनो पाहिजे ते मागा

कुठल्याही परिस्थितीत आपण
जिंकायलाच हवी ही जागा
आपल्याकडे काहीच कमी नाही
मनमानेल तसे बिनधास्त वागा

दुसऱ्या पक्षांतील नेत्यांशीही
बेमालूमपणे जुळवा धागा
काहीच कमी पडणार नाही
चमच्यांनो करू नका त्रागा

प्रचाराला लागावेच लागणार
खादीचे डगले घ्या शिवून
जास्त अक्कल असणाऱ्याकडून
अभ्यासपूर्ण भाषणे घ्या लिहून

सर्व संस्था आपल्याच कब्जात
प्रचारकार्य करू नका भिऊन
रात्री भरपूर ढोसता येईलच
दिवसा प्रचार करू नका पिऊन

निवडणुका पार पडेपर्यंत तरी
सज्जन असल्यासारखे रहा
आचारसंहिता पाळली पाहिजे
प्रचाराची अंतिम वेळ रात्री दहा

मतदारराजाला घरपोच द्या
रोकड पैसे दारू अन्‌ मटन
मतदार मिठाला जागणारे
नक्कीच दाबणार आपले बटन

आचारसंहिता असली तरी
आपण काहीतरी मार्ग काढू
मतदाराजाच्या पंगतीला
काय हवे ते हवे तितके वाढू

मागे पुढे कुणीच पाहू नका
पाच वर्षांतून एकदाच वाटायचे
एकदा सत्ता ताब्यात आली की
पाच वर्षे मनसोक्तपणे लाटायचे

प्रचारयंत्रणा शिस्तीत राबविणे
आपणास एकदमच आहे सोपे
आपण गावोगावी पोसलेत
अनेक लाचार पोटभरू भोपे

-विजय वहाडणे

Leave A Reply

Your email address will not be published.