टॅंकरची धडक बसून वृध्द ठार

शेवगाव – टॅंकरची धडक बसून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या वृध्दास तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शेवगाव शहरातील क्रांती चौकात बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
उत्तमराव काशीनाथ दारुकुंडे (वय 85, रा. दादेगाव ता. शेवगाव) असे मृताचे नाव असून शेवगाव येथे राहणाऱ्या मुलाकडे जाण्यासाठी ते सकाळी येथे आले होते.

ते क्रांती चौकात आले असतांना नेवाशाहून गेवराईकडे जाणाऱ्या इथेनॉलच्या टॅंकरने त्यांना जोरात धडक दिल्याने त्यांच्या पायाला व डोक्‍यास जबर मार बसला. चौकातील नागरिक मदतीसाठी धावले. एस. टी. आगारात असलेले मृताचे पुतणे गणेश राम दारकुंडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना लगेच ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र तेथील डॉक्‍टरांनी ते अगोदरच मृत झाले असल्याचे घोषित केले. याबाबत गणेश दारकुंडे यांनीच टॅंकर चालक अशोक बापू गर्जे (रा. जोहरापूर) याच्या विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave A Reply

Your email address will not be published.