जामखेडमध्ये तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

जामखेड – सततचा दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून तालुक्‍यातील नान्नज येथील शेतकरी नितीन जगन्नाथ मोहळकर (वय 28) या तरुण शेतकऱ्याने बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची टंचाई आहे. नितीन मोहळकर याच्या नावावर साडेतीन एकर जमीन आहे. अडीच एकरावर डांळिंबाची लागवड केली होती. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्याने डांळीबाची बाग करपू लागली. त्यामुळे तीन महिन्यांपासून टॅंकरने पाणी घालून बाग जगवण्याची धडपड सुरू होती. एका एकरात कांदा लागवड केली होती. मात्र कांद्याचे भाव पडल्याने, तो काही दिवसांपासून मानसिक दडपणाखाली होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंकेचेही काही प्रमाणात कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दुपारी चार वाजता नितीनची आई व इतर नातेवाईक शेतात जाण्यासाठी जुन्या घरी गेल्यावर अचानक समोर हे नितीन मोहळकरने घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहून आरडाओरड झाली, शेजारी लोकांनी ताबडतोब जामखेड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी तपासणी करून मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी पाठविले. यावेळी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा नान्नज गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीनच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, चार वर्षांची मुलगी व दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)