हनुमान विद्यालयात शिक्षक नसल्याने पालक संतप्त 

बेलपिंपळगावकरांचा टाळे ठोकण्याचा इशारा : वारंवार मागणी करूनही संस्थाचालकांचे दुर्लक्ष

बेलपिंपळगाव  – शाळा सुरू होऊन तीन महिने होऊनही नेवासे तालुक्‍यातील हनुमान विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी शाळेलाच टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. तसेच संगणक, क्रीडा, चित्रकला विषयालाही येथे शिक्षक नाहीत. 1 सप्टेंबरपर्यंत शिक्षक न असल्यास 5 सप्टेंबरला शाळेला टाळे ठोकू, असा उल्लेख मुख्याध्यापकांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बेलपिंपळगाव येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे श्री हनुमान विद्यालय आहे. येथे मागील काही वर्षापासून शाळेत चित्रकला आणि क्रीडा या विषयासाठी शिक्षक उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना संगणक शिक्षक नाही. दहावीच्या वर्गाला विज्ञान शिकविण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्‍न पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी एक महिन्यापासून वेळोवेळी शाळेला सूचना केली. विज्ञानाचे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत. विद्यार्थ्यांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी पालकांनी केली होती. मात्र संबंधीत संस्था, शाळेने या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले, असा आरोप पालकांनी केला आहे.

1 सप्टेंबरपर्यंत येथे विज्ञान विषयाचे शिक्षक उपलब्ध झाले नाही, तर 4 सप्टेंबरपासून शाळेला टाळे ठोकू, असा इशारा पालकांनी येणार असून यावेळी शाळा बंद ठेवली जाईल, असे निवेदन पालकांनी मुख्याध्यापक चंद्रकांत दरंदले यांना दिले. याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री, संस्थेला देखील देण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या वेळी तंटामुक्‍ती समिती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुभाष साठे, माजी सभापती वसंतराव रोटे, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कांगुणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर गटकळ, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र शेरकर, माजी सरपंच राजेंद्र साठे, आदींसह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

“गावातील श्री हनुमान विद्यालयासाठी गोरगरीब जनतेने वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले. ही इमारत उभी राहण्यासदेखील गावकऱ्यांचा मोठा हातभार आहे. परंतु यापूर्वी कधीही शाळेत असा प्रकार घडला नाही. विद्यार्थ्यांना शिकविण्यास शिक्षक उपलब्ध नसतील, यासारखी निषेधार्ह बाब नाही. शाळा प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर 4 सप्टेंबरला पालक शाळेला टाळे लावल्याशिवाय राहणार नाहीत.-चंद्रशेखर गटकळ, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती

“मुख्याध्यापक म्हणून येते एक महिन्यापूर्वी हजर झालो. त्या वेळेपासून ठिकाणी दहावीच्या वर्गात विज्ञान विषयाचे शिक्षक नाहीत. शाळेत मागील काही वर्षापासून चित्रकला, क्रीडा, संगणक शिक्षक नाहीत. ही बाब लक्षात आल्यानंतर वरीष्ठ पातळीवर संस्थेला कळविले. या ठिकाणी लवकरच शिक्षक उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी मला सांगितले आहे.
-चंद्रकांत दरंदले ,मुख्याध्यापक, हनुमान विद्यालय

“शाळा सुरू होऊन तीन महिने झाले. अजूनही आमच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक नाही. बाकीच्या विषयांचा अभ्यास पुढे गेला. विज्ञान विषयाचे फक्‍त एक ते दोनच प्रकरणे झाले आहेत. यामध्ये आमचे नुकसान होत आहे. तरी लवकरच आम्हाला विज्ञान विषयाचे शिक्षक मिळावेत.
-प्रियंका आप्पासाहेब साठे ,विद्यार्थिनी, दहावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)