नगर – नगर महापालिकेच्या आयुक्तपदी शंकर गोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने आज त्यासंदर्भात आदेश दिले असून, गोरे यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याची सूचना करण्यात आली आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार 31 डिसेंबर 2020 रोजी सेवानिवृत्त झाले. तेंव्हापासून महापालिका आयुक्तपदाचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आलेला होता.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आज नगर दौर्यावर आहेत. त्याचवेळी शंकर गोरे यांचा महापालिका आयुक्तपदी नियुक्तीचा आदेशही देण्यात आल्याने हा योगायोग ठरला. शंकर गोरे यांच्याकडे सध्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा पदभार होता. गोरे यांनी महापालिका आयुक्तपदाचा तत्काळ पदभार स्वीकारून त्याचा अहवाल शासनाला पाठवावा, असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
नगरला आयएएस दर्जाचा नवीन व खमक्या अधिकारी मिळावा, अशी नगरकरांची व येथील राजकीय नेत्यांचीही मागणी आहे. तथापि, आतापर्यंत निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकारी नगरला देण्यात आल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवक नेहमी करतात.
नगरला येणारे अधिकारी सहलीला आल्यासारखे येतात, असा आरोप माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यातच केला. परंतु, तोपर्यंत गोरे यांच्या नियुक्तीचे आदेश येथे धडकले होते. त्यामुळे आता काही बदल होईल, अश शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.