जामखेड : जामखेड नगरपरिषदेकडून महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करूनही शहरातील अनेक भागांत स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. सफाई ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे शहराची अवस्था बिकट झाली आहे. शहराच्या काही भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तसेच शहरात स्वच्छतेची योग्य व्यवस्था नसल्यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना समस्या व आजारांना सामोरे जावे लागत आहे.
नगरपरिषदेकडून घंटागाड्यांची सोय करण्यात आली, मात्र असे असतानाही अनेक भागात मुख्य रस्त्याच्या कडेलाच जागोजागी कचऱ्याचे ढीग साठल्याने दिसून येत आहेत.शहरात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहे. ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ ही संकल्पना जाहिरातीपुरतीच सिमीत असून पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले असून,नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, स्वच्छता विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
जामखेड नगरपरिषद ही सर्वांगीण दृष्टीने सधन आहे. त्यात नगरपरिषद हद्दीत स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी नगरपरिषद महिन्याला लाखो रुपये खर्च करत आहे. हे स्वच्छता कर्मचारी सकाळपासून सायंकाळपर्यंत स्वच्छता करण्याचे काम करतात. मात्र, असे असतानाही सध्या अनेक प्रभागात जागोजागी कचऱ्याचे साठल्याचे दिसून येत आहेत. घंटागाड्या कचरा जमा करण्यासाठी गल्लोगल्ली फिरतात. मात्र, काही क्षणात त्या ठिकाणी पुन्हा कचऱ्याचा ढीग तयार होतो. अनेक भागात घंटागाडीत कचरा न टाकता नागरिक चक्क रस्त्याकडेला कचरा टाकून पसार होताना दिसत आहेत. शहरातील अनेक भागात घंटा गाड्या फिरकत नसल्याच्याही तक्रारी आहेत.
शहरातील लोकमान्य वाचनालय परिसर, कोर्ट रोड, तहसील रोड, तपनेश्वर गल्ली, नगर रोड, बीड रोड अशा वर्दळ असलेल्या भागासह शहरातील अन्य काही प्रभागांत अनेक ठिकाणी रस्त्यावर व रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग दिसून येतात. काही ठिकाणी तर रस्त्यावरून जाताना अक्षरशः तोंडाला रुमाल लावून रस्ता पार करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
दरम्यान, मागच्या काही वर्षांपासून शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर स्वच्छता कर्मचारी, घंटागाड्या वाढवणेही तेवढेच गरजेचे बनले आहे. नगरपरिषदेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन जास्तीत-जास्त स्वच्छतेवर भर द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे. त्यामुळे आता तरी नगरपरिषद स्वच्छतेवर अधिक भर देईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे असताना देखील ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम नगरपरिषदेचे अधिकारी करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.