राष्ट्रवादी युवकची महापालिकेत निदर्शने

गणेश भोसलेंचा प्रभाग केला लक्ष्य

नगर – महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून मोर्चोबांधणी सुरू झाली असून त्याच पार्श्‍वभूमिवर राष्ट्रवादी युवकने आज थेट मनसेचे नगरसेवक गणेश भोसले यांच्या प्रभागावर आगपाखड करून महापालिकेत निदर्शने केली. प्रभाग 30 मध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकूनगूणिया, गोचीडताप यासारख्या साथीच्या आजाराने थैमान घालते असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसह घाणीच्या साम्राज्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन करून अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांना निवेदन देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, शहर जिल्हाध्यक्षा रेश्‍मा आठरे, दिलिप झिंजुर्डे, चेतन चव्हाण, मिलिंद शिंदे, विनोद खैरे, डॉ.प्रशांत कुताळ, डॉ. उमेशचंद्र सुद्रिक, डॉ. सचिन चंगेडिया, बैजू लोढा, दिनेश संकलेचा, सचिन दळवी, अवि काळे, विकास झिंजुर्डे, विशाल पवार, प्रशांत झिंजुर्डे, रुपेश चोपडा आदीसह प्रभागातील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

प्रभाग 30 मध्ये भोसले आखाडा, माणिकनगर, विनायकनगर, चाणक्‍यचौक या भागात डासांचे साम्राज्य वाढले आहे.त्यामुळे साथीच्या आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे. सध्या स्वाइनफ्लू आजारही शहरात दाखल झालेला आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नगर शहरातील नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या गोष्टींना आरोग्य विभाग कारणीभूत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत धूर फवारणी फक्‍त तक्रारदाराच्या घरापुरतीच केली जाते. परंतु संपूर्ण प्रभागात धूर फवारणी केली जात नाही. त्यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. याच प्रभागातील बुरूडगाव रोडवरील जकात नाका येथे रस्त्याच्या बाजूला कचराकुंडी ठेवली आहे. त्यामध्ये कचरा साचून खूप दूर्गंधी येत आहे.

नागरिकांना त्या त्याठिकाणाहून चालणेही मुश्‍कील झाले आहे. त्यातच रस्त्यावरील मोकाट कुत्रे सुद्धा या कचऱ्यामध्ये असतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या महिला, मुले, ज्येष्ठ नागरिकांना हे कुत्रे चावा घेत आहेत. अनेक वेळा तक्रार करूनही या कचऱ्याची व कचराकुंड्यांची विल्हेवाट लावली नाही. अशीच अवस्था बुरूडगाव रोड समोरील कचऱ्याची झालेली आहे. रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकल्यामुळे व नित्यनियमाने स्वच्छता नसल्यामुळे प्रभाग क्रमांक 30 हा कचरा व दूर्गंधीमय झाला आहे.

साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी सातत्याने धूर फवारणी कीटकनाशक फवारणी व ब्लिचिंग पावडर यासारख्या फवारण्या त्वरित कराव्यात, अन्यथा प्रभाग क्रमांक 30 मधील नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)