शिर्डी : आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी, यासाठी भाजपाने शिर्डीत नुकतेच राज्यस्तरीय अधिवेशन घेतले. त्यानंतर आठवडाभरातच भाजपाचा सत्तेतील सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही याच मुद्द्यांवर शिर्डीत पक्षाचे अधिवेशन आयोजित केले आहे.
अजितपर्व..! दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची..! हे घोषवाक्य असलेल्या या शिबिराचे ‘नवसंकल्प’ असे नामकरण करण्यात आले आहे. येत्या १८ व १९ जानेवारी असे दोन दिवस शिर्डीतील हॉटेल पुष्पक येथे हे शिबीर होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्षसंघटना बांधणी यावर राज्यस्तरीय दोन दिवसांचे शिबिरात मंधन आणि नियोजन होणार आहे. याच वेळी सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ होणार आहे. पहिल्यांदा अजित पवार स्वत: नोंदणी करतील. राज्यभरात सदस्य नोंदणीचा कार्यक्रम त्यानंतर लगेच सुरू होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहित आहेत. त्यांचा हाच उत्साह पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही यश मिळवून देईल. या शिबिरात जास्तीत-जास्त सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे या शिबिराला वेगळे महत्व आहे. आम्ही शिबिराचे तयारीला लागलो आहोत.
-आशुतोष काळे,आमदार
राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष संदीप सोनावणे, बाबासाहेब कोते, रमेश गोंदकर, दीपक गोंदकर आदी उपस्थित होते. नियोजनाच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली.