नगर – अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेला घनकचरा व्यवस्थापन विभागाप्रमुख नरसिंह पैठणकर याला निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सतीश राजूरकर यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.
प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज हे आदेश काढले. मनपाच्या सावेडी कचरा डेपोत अडीच लाखांची लाच घेतांना पैठणकरला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मनपा हद्दीत मृत जनावरांच्या दाहिनीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात नेरीने त्रुटी काढल्या आहेत, असे सांगून त्याने प्रकल्प चालकाकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 2 लाख 50 हजारांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या कारवाईनंतर पथकाने पैठणकर याला ताब्यात घेवून त्याचे कार्यालय व त्याच्या घराची तपासणी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी नरसिंह पैठणकर याला हजर केले होते. त्याला येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने पैठणकर याला निलंबित करत त्यांच्याकडील पदभार डॉ. राजूरकर यांच्याकडे देण्यात आला आहे.