नेवासा : रात्रीच्या वेळी चोरीच्या मोटार सायकलवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन तरुणांना शिताफीने पकडून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नेवासा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, पोलीस नाईक संदीप बर्डे, पो.कॉ.सलमान शेख हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त घालत होते.
सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास नेवासा शहरातून फाट्याकडे जात असताना नेवासा कोर्टाजवळ एका मोटार सायकलवर दोन इसम संशयास्पद नेवासा फाट्याकडे जाताना दिसले. त्याचे नाव अर्जुन गणेश घुंगासे (वय २० सध्या रा.नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द मूळ रा. औरंगपुरा,भाजी मंडई जि.छत्रपती संभाजीनगर) व ओमकार बंडू भणगे (रा.लोखंडे गल्ली, नेवासा खुर्द )असे सांगितले. त्यांचे ताब्यात मोटार सायकल (नंबर एम.एच.२० डी.के २४४१) मिळून आली.
मालकी हक्काबाबत विचारपूस करता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही. काही वेळातच तपास पथकातील पोलीस कर्मचारी पोहचले. त्यांच्याकडील मोटारसायकल ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशनला आणले. संभाजीनगर येथील मित्र सागर यांच्याकडून मोटारसायकल ही आणल्याचे दोघांनी सांगितले. मोटार सायकलच्या नंबरवरून मूळ मालकांशी पोलिसांनी संपर्क केला असता त्यांनी ही मोटारसायकल (एम.एच २० डी.के २४४१) माझे नावावर असून ती तीन महिन्यांपूर्वी वाळुंज परिसरातून चोरीस गेली होती.
याबाबत वाळुंज पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेजण नेवासा हद्दीत मोटारसायकलवर संशयास्पदरित्या फिरताना मिळून आल्याने त्यांच्यावर नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार अजय साठे हे करत आहेत.