जामखेड : राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घेऊन जास्तीत-जास्त तडजोडीने मिटणारी प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात जामखेड न्यायालयाचा तालुक्यामधून प्रथम क्रमांक पटकवला, अशी माहिती जामखेड न्यायालयाचे दिवाणी व प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती जामखेडचे अध्यक्ष वैभव जोशी यांनी दिली आहे.
तालुका विधी सेवा अंतर्गत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जामखेड न्यायालयात करण्यात आले होते. पंचायत समिती जामखेड व तालुक्यातील इतर विभागांच्या मदतीने मागील काही लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला होता. दि. २२ मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदलातीमध्ये देखील अदाजे ८५०० पेक्षा जास्त दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली असून] यापैकी ८१६० प्रकरणे केवळ ग्रामपंचायतमधील कर वसुली संदर्भात आहेत. या माध्यमातून 34 लाख पेक्षा जास्त कर वसुली झाली असल्याची माहिती गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी दिली.
लोकअदालत ही न्यायालयीन लढाई विनाखर्च व वेळेची बचत करून संपविण्याचा सहज व सोपा मार्ग आहे. पक्षकारांनी एकदा तरी याचा अनुभव घ्यावा. नाहीच तडजोड होऊ शकली तर न्यायालये कायद्याप्रमाणे योग्य तो निर्णय देतीलच, पण एकदा लोकअदालततीच्या माध्यमातून तडजोडीसाठी प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे विधिज्ञांनी देखील त्यांच्या पक्षकारांना लोकन्यायालयाबाबत जागरूक व प्रोत्साहित करावे.
-वैभव जोशी, दिवाणी व प्रथम वर्ग न्यायाधीश