जामखेड – तालुक्यातील खर्डा, पिंपळगाव आळवा, घोडेगाव परिसरात शनिवार (ता. 18) मार्च रोजी दुपारी अवकाळी पाऊस व गारपीटने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर ज्वारी, गहू, हरबरा, कांदे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये गारांचा खच साचलेला होता.
जामखेड तालुक्यातील काही भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असून थोड्याफार प्रमाणात अवकाळी पाऊसही पडत आहे. आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही, त्यात अवकाळी पावसाचे संकट, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
दिलीप चंद्रकांत मोहिते पिंपळगाव आळवा या शेतकऱ्याच्या फळबागाचे व ज्वारी, गहू कांदा या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मोहिते यांचा अक्षरश: संत्रा फळबागेचा गारपीटीने खाली खच झाला आहे. झाडांच्या फांद्या मोडल्या आहेत. त्याच बरोबर रामकिसन भागडे, भगवान भागडे, दत्तात्रय गायकवाड, सतिष गायकवाड, बाळासाहेब मोहिते, अशोक मोहिते, भारत बारवकर, या शेतकऱ्यांसह आदी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.