महसूल कर्मचाऱ्यांची पोलिसांविरुध्द निदर्शने

पोलिसांच्या अनोख्या तंटामुक्तीवर रंगली चर्चा

महसूल विभागातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची फेसबुकवर बदनामी होईल, असा मजकूर काही दिवसांपूर्वी कटकारस्थान करून टाकण्यात आला होता. या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी या प्रकाराविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. सायंकाळी चार वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या महिला वरिष्ठ अधिकारी तक्रार देण्यासाठी बसून होत्या. इतरवेळी कर्तव्यदक्षपणे गुन्हा दाखल करून घेणारे पोलीस अधिकारी मात्र यावेळी या महिला अधिकाऱ्यांची समजूत घालण्याच्या भूमिकेत होते. उशिर झाला म्हणून या महिला अधिकाऱ्याला दुसऱ्या दिवशी बोलविण्यात आले. परंतु दुसऱ्या दिवशी या प्रकरणावर पडदा पडला होता. पोलिसांची ही अनोखी तंटामुक्ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

नगर  : महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना पोलिसांकडून अभय मिळत आहे. या हल्लेखोरांना अटक करण्यासाठी मंडलाधिकारी आणि महसूल कर्मचारी संघटनेने आज नगर तालुक्‍यातील महसूल अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कर्मचारी संघटनेने निदर्शने करत हल्लेखोरांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांचा निषेध केला. आंदोलनकांनी यावेळी केलेल्या निषेधाच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

नागापूर येथील मंडालाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांच्यावर तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात गौतम बोरा याने हल्ला करत मारहाण केली होती. शुक्रवारी हा प्रकार झाला होता. आव्हाड यांनी याप्रकरणी तोफखाना पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तरी देखील गौतम बोराला अटक झाली नाही. कोणतीही कारवाई झाली नाही. गौतम बोराला अटक करण्यासाठी पोलिसांनी बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. निदर्शनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी निवेदन देण्यात आले. गौतम बोराला अटक होत नाही, तोपर्यंत लेखणी बंद राहिला, असा इशारा मंडलाधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश गावडे यांनी यावेळी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या आंदोलनात नगर तालुका महसूल क्षेत्रातील सुमारे 150 कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाने यावरही दखल न घेतल्यास हे लेखणी बंद आंदोलन 29 तारखेपासून जिल्हाभर केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

“महसूल अधिकाऱ्यांना नेहमीच पोलिसांकडून टार्गेट केले जात आहे. मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांच्यावर हल्ला झाली, तरी पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. आव्हाड यांच्यावरील हल्ल्यानंतर आरोपी कोणकोणाच्या संपर्कात होता याचे कॉल डिटेल्स तपासण्याची प्रमुख मागणी निवेदनाद्वारे केली आहे. महसूल अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांचा घटनेचा न्याय पातळीवर आम्ही पाठपुरावा करत राहणार आहे.
– आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार

दरम्यान, गौतम बोरा याला बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा घडून सहा दिवस झाले तरी गौतम बोरा याला अटक केली नाही. त्यामुळेच त्याला जामीन मिळविता आला. पोलिसांच्या अपयशाबद्दल महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेने यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांच्या सहकार्यानेच त्याला जामीन मिळविता असल्याचा आरोपही संघटनेने केला.

या जामिनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची भूमिका महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेने रात्री उशिरा घेतली होती. प्रातांधिकारी उज्वला गाडेकर, प्रातांधिकारी गोविंद दाणेज, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, नायब तहसीलदार वैशाली आव्हाड, संजय परदेशी, रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)