मसापच्या वतीने उद्या काव्यसंमेलन

नामवंत कवींचा सहभाग; प्रा. उपाध्ये यांचा सत्कार

नगर – रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात सोमवारी (दि. 27 रोजी) सायंकाळी सहा वाजता काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातले नामवंत कवी भरत दौंडकर, उद्धव कानडे, तुकाराम धांडे, शशिकांत शिंदे, गणेश मरकड, डॉ. कैलास दौंड यांच्यासह अन्य नामवंत कवींच्या कवितांच्या पाऊसधारात रसिकांना चिंब भिजता येईल. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेने हा अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमात वाचन संस्कृती संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या नगर जिल्हा वाचनालय, शब्दगंध साहित्य परिषद या संस्थांना तसेच ज्येष्ठ साहित्यीक प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे, असे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. मधुसूदन बोपर्डीकर, चंद्रकांत पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. फिरोदिया यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल ट्रस्टने प्रायोजकत्व स्विकारले आहे. अशा या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष भालचंद्र बालटे, उपाध्यक्ष सदानंद भणगे, कोषाध्यक्षा स्नेहल उपाध्ये व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हा वाचनालय गेल्या 150 वर्षांपासून नगरमध्ये कार्यरत आहे. वाचकांची भूक भागवण्याचे काम या वाचनालयाने केले आहे. शब्दगंध साहित्य परिषदेने वंचित साहित्यीकांना विचारपीठ उपलब्ध करून दिले आहे. गेल्या 18 वर्षांपासून साहित्यिक उपक्रमात त्यांचा सहभाग राहत आलेला आहे. प्रा.डॉ. उपाध्ये यांची साहित्य सेवा कौतुकास्पद आहे. मराठी भाषेचे संवर्धन करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.

फिरोदिया यांच्या नेतृत्वाखाली सावेडी महाराष्ट्र साहित्य परिषदेने स्थापनेपासूनच अभिनव साहित्यिक उपक्रम सुरू केलेले आहेत. युवकांना विचारपीठ दिले. “वारसा’ या दिवाळी अंकाच्या माध्यमातून जिल्हा, शहराची साहित्य परंपरा जोपासली. ज्येष्ठ तसेच तरुण साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी कवी संमेलनाचे आयोजन केले. गेल्या वर्षी नगर येथे झालेले विभागीय साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल. यापुढेही अशीच परंपरा सुरू राहील, असे येलूलकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)