नगर : मनपा निवडणुकीत एमआयएम ‘लक्ष्यभेदी’च्या तयारीत 

नगर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून निरीक्षकांनी मते जाणून घेतली.

पक्ष निरीक्षकांच्या उपस्थित झाली नगर शहरासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक

नगर – मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीनने (एमआयएम) नगर महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निरीक्षक तथा औरंगाबाद महापालिकेचे नगरसेवक अय्युब जहागिरदार यांनी नुकताच नगरमध्ये येऊन पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्‍टर, वकील व धर्मगुरूंशी वैयक्तिक मॅरेथॉन बैठका घेऊन संवादही साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही बैठक म्हणजे, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएमची लक्ष्यभेदी ठरेल, असा विश्‍वास पक्षातील निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. पक्षात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांनी देखील निरीक्षक जहागिरदार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती मिळते आहे. यावर मात्र त्यांनी जाहिर अशी भूमिका मांडली नाही. ती पक्ष नेतृत्व घेतील असे त्यांनी सांगितले.

भारतीय बहुजन पक्षाबरोबर राष्ट्रीय पातळीवर झालेली आघाडीमुळे एमआयएमने राज्यात येऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. नगर शहरासह जिल्ह्यात एमआयएमचे सुरूवातीला मूठभर कार्यकर्ते होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्ते सर्वत्र वाढल्याचे चित्र आहे.

मुस्लिम, मागसवर्गीयांबरोबर इतर समाजातील देखील कार्यकर्ते देखील पक्षाच्या चांगलेच संपर्कात आले आहेत. त्यामुळे पक्षाने देखील नगरमध्ये यावेळी लक्ष घालण्याचे ठरविले आहे. त्यानुसारच पक्षाचे निरीक्षक अय्युब जहागिरदार यांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. जहागिरदार यांच्याबरोबर नगरसेवक विकास ऐडके, ईसाक खान हे देखील उपस्थित होते.

पक्ष निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली झालेली ही बैठक नगर शहरासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उभारी देणारी ठरली आहे. महापालिका निवडणुकीला समोरे जाण्याचा सर्वोत्तोपरी निर्णय पक्ष अध्यक्ष असद्दीन ओवेसी व आमदार इमतियाज जलील घेणार आहेत. एमआयएम महापालिका निवडणूक लढविणार असल्याचे या बैठकीत निश्‍चित झाले आहे.
– डॉ. परवेज अशर्फी सचिव, एमआयएम, नगर

या तिघा पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून महापालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण चर्चा केली. पक्षाबरोबर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. ती लक्षात घेऊन पक्षाने वेगाने हालचाली कराव्यात, असा आग्रह यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरला होता. शहरासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांना पक्षात काम करण्यासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात याव्यात. काम करण्याची पद्धत सांगण्यात यावी.

वेळच्यावेळी पक्ष निरीक्षकांकडून आढावा घेण्यात यावा. कार्यकर्त्यांकडून कामे करून घेण्याबरोबर सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात काम करण्यासाठी बळ द्यावे, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर ठेवली.
पक्ष निरीक्षकांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यानंतर विचारवंत, उद्योगपती, राजकीय पदाधिकारी, धर्मगुरू यांच्याशीही बंद केबिनमध्ये चर्चा केली. इतर पक्षाचे पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

या पदाधिकाऱ्यांकडून निरीक्षकांनी शहरात नव्याने होत असलेल्या प्रभाग रचनेचा आढावा घेतला. त्याचबरोबर शहरातील प्रलंबित कामांची माहिती घेतली. एमआयएमचे जिल्हा सचिव डॉ. परवेज अशर्फी, सामाजिक कार्यकर्ते अफजल सय्यद, सरफराज जहागिरदार, ताहेर सय्यद, नजीर शेख, इमरान शेख, समीर बेग, शहाद कुरेशी, अंजर खान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)