नगर – जिल्ह्यात व विशेष करुन नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ काही बेजबाबदार नागरिकांमुळे सर्वांचेच आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे आता बाजारपेठेतील ज्या दुकानांत विनामास्क नागरीक किंवा ग्राहकांची गर्दी आढळून येईल, अशी दुकाने पुढील महिनाभरासाठी बंद करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दिला.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्यासह रस्त्यावर उतरुन कारवाई केली. विनामास्क फिरणार्या आणि प्रवास करणार्या नागरिकांवर तसेच सरकारी कार्यालयात विनामास्क वावरणार्या कर्मचार्यांवरही त्यांनी थेट दंडात्मक कारवाई केली.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज करोना विषयक परिस्थितीचा आढावा थेट बाजारपेठेत उतरुन घेतला. पोलीस अधीक्षक पाटील, महापालिका आयुक्त गोरे यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे यावेळी उपस्थिती होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि पोलीस अधीक्षक पाटील यांनी थेट भिंगारवाला चौक गाठला. तेथील दुकानांत तसेच रस्त्याने विनामास्क फिरणार्या नागरिकांना फटकारले आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. ज्या व्यक्ती विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.
तेथून त्यांनी पुण्याकडे जाणार्या बसेस थांबतात, त्या स्वस्तिक बसस्थानकात शिवशाही बसमध्ये असणार्या विनामास्क प्रवाशास इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करण्याबद्दल फटकारले आणि त्यांना दंड भरण्यास सांगितले. तेथील अन्य बसेसचीही त्यांनी तपासणी केली. जिल्हा परिषदेला त्यांनी भेट दिली. तेथे विनामास्क आढळलेल्या कर्मचार्यांवर दंडात्मक कारवाई केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सरकारी इमारतीमध्येही काही कर्मचारी विनामास्क आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला.