कुख्यात दरोडेखोर पपड्याच्या मुसक्‍या आवळल्या

कोळपेवाडी दरोडा प्रकरण : साधूचा वेश करून पत्नीसह करत होता पलायन

पपड्याने आतापर्यंत घेतले चौघांचे बळी

आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील अहमदनगर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, परभणी, गोंदिया, सांगली, हिंगोली, जालना जिल्ह्यात दरोडे घातले आहेत. हे दरोडे घालताना केलेल्या गोळीबारात तिघांचा बळी घेतला आहे. कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथेही झालेल्या गोळीबारात पपड्याने चौथा बळी घेतला आहे. पपड्या हा खुनाच्या गुन्ह्यात नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मुलाच्या लग्नाचे कारण देत तो पॅरोल रजेवर आला होता. रजेवर येताच त्याने कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर दरोडा घालत शाम धाडगे यांचा गोळीबारात बळी घेतला.

नगर  – साधूचा वेश करून पत्नीसह पलायन करत असलेला कुख्यात दरोडेखोर पपड्याच्या मुसक्‍या आवळ्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील सुमारे 13 आणि दरोड्यातील सोने विकत घेणारे तीन सराफ, असे एकूण 16 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पपड्या ऊर्फ संजय ऊर्फ राहुल व्यंकटी ऊर्फ महादू ऊर्फ महादेव ऊर्फ गणपती काळे ऊर्फ तुकाराम चव्हाण याच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दहा पथके कार्यरत ठेवली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके कार्यरत होती. पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण यांनी पपड्याच्या शोधासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. मेहेकर (बुलढाणा) येथे पपड्या असल्याची माहिती होती. तो त्याच्या पत्नीसह तेथून पसार होणार असल्याचेही पोलिसांना समजले होते. मेहेकर पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा लावून कारवाईला सुरूवात केली. संपूर्ण परिसरातच नाकाबंदी लावली. पपड्या हा त्याच्या पत्नीसमेवत होत, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांनी तिथेही मिळाली.

पोलीस बसस्थानक परिसर पिंजून काढत होते. परंतु पपड्या कोठेही आढळून येत नव्हता. बसस्थानक परिसरात एक जण भगवे कपडे परिधान केलेला, दाढी वाढविला आणि रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या व्यक्तीच्या संशायस्पद हालचाली सुरू होत्या. त्याच्याबरोबर एक महिला होती. पोलिसांची त्याच्यावर नजर खिळली. वेशांतर केले असल्याने पपड्या लक्षात येत नव्हता. पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण यांनी त्याचे बारकाईने निरीक्षण केले. देहबोलीवरून तो पपड्याच असल्याचे त्यांची खात्री पटली. त्यानुसार या दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशीला सुरूवात केल्यावर त्याने संजय महादू काळे हे नाव सांगितले. पोलिसांकडे पपड्याचे जुने वर्णन होते. शरीरावरील खुणांची नोंद होती.

अभिलेखावरील वर्णनानुसार चौकशी केल्यावर पोलिसांची खात्री पडली आणि चौकशी सुरू केली. यावर पपड्या बोलता झाला आणि खरी ओळख सांगितली. पपड्या ऊर्फ संजय ऊर्फ राहुल व्यंकटी ऊर्फ महादू ऊर्फ महादेव ऊर्फ गणपती काळे ऊर्फ तुकाराम चव्हाण (वय 55, रा. सुदर्शनगर, वर्धा) व त्याची पत्नी रेखा (वय 40) या दोघांना पोलिसांनी अठक केली.

कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर 19 ऑगस्टला सायंकाळी पपड्या आणि त्याच्या टोळीने दरोडा घातला होता. बाजारपेठेत दंगलसदृश परिस्थिती निर्माण करून हा दरोडा पपड्याच्या टोळीने घातला होता. लक्ष्मी ज्वेलर्स दुकानात शिरल्यावर तेथील सोने-चांदीचे दागिने घेत पपड्याने तिथेही गोळीबार केला होता. या गोळीबारात दुकानाचे संचालक शाम धाडगे यांचा मृत्यू, तर त्यांचे बंधू गणेश हे गंभीर जखमी झाले होते.

स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करत दरोडा टाकण्याच्या पद्धतीवर हे कुख्यात दरोडेखोर पपड्याच्या टोळीचे काम असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी टोळीतील 13 जणांना पकडले होते. पपड्याने दरोड्यातील मुद्देमाल त्याच्या मुलांच्या मदतीने औरंगाबाद येथील सराफांना विकला होता. सुमारे 36 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. दरोड्यातील सोने घेणाऱ्या औरंगाबाद येथील तीन सराफांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या या दमदार कारवाईमुळे पपड्याची पळताभुई कमी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)