जामखेडमध्ये भरदिवसा चोरांचा धुमाकूळ

5 तोळे सोने व 18 हजार रोख लंपास; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

जामखेड – शहरासह तालुक्‍यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न बिकट झाला असून घरफोड्या, चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक कमी झाल्याचे चित्र आहे. पोलीस दिवसरात्र गस्त घालत असतानाही शुक्रवारी शहरातील एच.यु. गुगळे फर्मचे नगर रस्त्यावरील आयकॉन रेसीडेन्सी अपार्टमेंटच्या दोन इमारतीत व परिसरातील दुसऱ्या इमारतीत तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या. यात एक घरफोडी भरदिवसा झाली असून 5 तोळे सोने व 2 हजार रोख चोरून नेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याच परिसरातील ज्ञानेश्वरी मेडिकलमधून 7 हजार व समोरच असलेल्या डॉ. शारदा डेंटल रुग्णालयातून 9 हजार तीनशे रुपये चोरीस गेले आहे. मेडिकलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटे कैद झाले असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत. जामखेड तालुक्‍यात सध्या चोर व गुन्हेगारांच्या रडारवर असून दिवसाआड छोट्या – मोठ्या चोरीच्या घटना शहरात घडत आहेत.

चोरांनी अपार्टमेंटमधील फ्लॅट लक्ष्य केले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, बसस्थानक परिसरात असलेल्या एच. यु. गुगळे फर्मचे नगर रस्त्यावरील आयकॉन रेसीडेन्सी अपार्टमेंटच्या फ्लॅट मधील चंद्रकांत दत्तात्रय ढवळे व त्यांची पत्नी हे दि 24 रोजी दुपारी 2 च्या सुमारास जवळच असलेल्या शांतीनाथ आश्रम मंदिरात गेले असताना भरदिवसा दुपारी साडेतीनच्या सुमारास यांच्या फ्लॅटच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवले.

पाच तोळे सोन्याचे दागिने यामध्ये तीन ग्रॅमची अंगठी, अकरा ग्रॅमचे नेकलेस, सात ग्रॅंमचे कानातील फुले व रोख 2 हजार चोरून नेले.दुपारी आल्यानंतर त्यांना घराचे दार उघडे असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी कपाटात ठेवलेले दागिने दिसले नाही. याबाबत चंद्रकांत ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दि. 25 रोजी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास याचा आयकॉन अपार्टमेंट परिसरातील डॉ.हजारे हॉस्पिटलच्या तळमजल्यातील असलेले ज्ञानेश्वरी मेडिकलच्या शटरचे कुलूप तोडून मेडिकलमधून 7 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. यावेळी मेडिकलमध्ये असलेल्या सीसीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरी करणारे 2 चोरटे कैद झाले आहेत. त्यानंतर याच चोरट्यांनी परिसरातील डॉ. शारदा डेंटल रुग्णालय बंद असलेले शटर तोडून चोरट्यांनी 9 हजार 300 रुपये चोरून नेले.

यानुसार डॉ. राहुल नंदकिशोर लद्दड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदार संघात दिवसा चोऱ्या होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमेतवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेईना.

याआधीही जामखेड बाजार समितीतील आडत दुकाने, राजुरी येथील कॅनरा बॅंक, खर्डा येथील कापड दुकानासह तीन दुकाने गेल्या 15 दिवसापूर्वीच फोडण्यात आले होते. या घटनांमधील आरोपींना अजूनही पोलिसांना ताब्यात घेता आले नाही. पोलीस प्रशासन चोऱ्यांचा तपास लावण्यात कमी पडत असल्याने चोर शिरजोर होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्‍त होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)