नगर -राहुरी तालुक्यातील शिलेगावमधील करपारवाडीतील दोन दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी छापा टाकून सहाशे लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट केले. तर भेसळीसाठी वापरत असलेली पावडर जप्त केली. त्यात एक केंद्र खासगी पशुवैद्यकीय डॅाक्टच्या मालकीचे असून, तो ही दूधात भेसळ करत होता. या दोन्ही केंद्राचे दूध संकलन परवाने अन्न व औषध प्रशासनाने रद्द केले आहेत.
या कारवाईत दोन्ही संकलन केंद्रावर प्रत्येकी तिनशे लिटर असे सहाशे लिटर भेसळयुक्त दूध आढळून आले. त्यात भेसळीसाठी वापरत असलेली पावडर, द्रावण असा 37 हजार रुपयांचा किंमतीचा साठा जप्त केला आहे. करपारवाडी येथील खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले दिलीप रघुनाथ म्हसे यांच्या मालकीचे गोरक्षनाथ दूध संकलन केंद्र व रमेश पाटीलबा म्हसे यांच्या म्हसे पाटील दूध संकलन केंद्र येथे दुधात भेसळ केली जात असल्याची माहिती नगरच्या अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.
त्यानुसार सहायक आयुक्त शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुटे, शरद पवार, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांनी बुधवारी सकाळी गोरक्षनाथ दूध संकलन केंद्रावर छापा टाकला. त्या ठिकाणी गोठ्यामध्ये दूध भेसळीसाठी साठवलेली शंभर किलोची व्हे पावडर, 40 लीटर व्हे पावर द्रावण, तिनशे लिटर गायीचे दूध असा 24 हजार 931 रुपयांचा साठा जप्त केला. तर रमेश म्हसे यांच्या दूध संकलन केंद्रावर 15 किलो व्हे. पावर व तिनशे लिटर गायीचे दूध असा 11 हजार 700 रुपये किंमतीचा साठा जप्त केला. भेसळयुक्त दूध व व्हे पावडरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर भेसळयुक्त दूध केंद्राचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
दररोज तिनशे लिटरचे दूध वाढवायचे
दोन्ही दूध संकलन केंद्रात दररोज 700 ते 790 लीटर दूध शेतकर्यांकडून संकलीत केले जात होते. त्यात अडीचशे ते तिनशे लिटर दूध वाढविण्यासाठी व्हे पावरडचा वापर केला जात. त्यानंतर हे दूध पुढे पाठविले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून मिळाली.
दोन दूध संकलन केंद्रातून पावडर वापरून द्रावण करून ते दूधात टाकून दूध वाढविण्यात येत होते. विशेष म्हणजे एका खासगी पशुवैद्यकीय डॅाक्टराच्या मालकीच्या केंद्रात हा प्रकार सुरू होता. भेसळयुक्त दूधाचे नमुने घेतले असून, तपासणीसाठी पाठविले आहे. दोन्ही केंद्राचे दूध संकलन थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
संजय शिंदे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नगर