अहिल्यानगर : नगर तालुक्यातील कामरगाव आणि परिसरातील गावांमध्ये सध्या विजेचे भारनियम सुरू आहे. दिवसा केवळ ४ तास वीज मिळत असल्याने शेतातील पिके जळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तातडीने दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी कामरगावचे माजी सरपंच गणेश साठे यांनी केली आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू असून पिकांना पाणी देणे खूप गरजेचे आहे. पाणी न मिळाल्यामुळे पिके जळून चालली आहेत. दिवसा फक्त ४ तास वीज असल्याने भरणे करताना अडचणी येत आहेत. रात्री देखील शेतकऱ्यांना भरणे करताना थंडीचा त्रास होत आहे. त्यातच गेल्या ४ दिवसांपूर्वी कामरगाव परिसरात बिबट्याच्या वावर आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. रात्री पिकांना पाणी देताना त्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.
वरील सर्व बाबींचा सहानुभूती पूर्वक विचार करून दिवसा वीज देताना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करावा, अशी विनंती कार्यकारी अभियंता योगेश चौहान यांना शिष्टमंडळाने भेटून केली. निवेदन देतेवेळी मा. सरपंच गणेश साठे, हाबु शिंदे, राजू पठाण, रावसाहेब ठोकळ, विजय साठे, शंकर कातोरे, योगेश आंधळे, भाऊसाहेब ठोकळ, पोपट जाधव आदी उपस्थित होते.