शिर्डी लोकसभेसाठी 62 टक्‍के मतदान

मागील निवडणुकीच्या तुलनेने मतदानात 2 टक्‍के घट

नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्‍का वाढल्याने आता शिर्डी लोकसभा मतदारसंघदेखील मतदानाचा टक्‍का वाढण्याची शक्‍यता मतदारांनी फोल ठरविली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेने तब्बल 2 टक्‍के घट यंदा मतदानात झाली आहे. सुमारे 62 टक्‍के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे. त्यामुळे उमेदवार धास्तावले आहेत. सलग असलेल्या सुट्ट्या व उन्हाचा तडाखा यामुळे मतदान कमी झाल्याचे व्यक्‍त होत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असल्याने या मतदारसंघातील नेतेमंडळीकडून मतदान घडवून आणण्यासाठी फारसे प्रयत्न होत नाही. तरी मतदार स्वयंस्फुर्तीने मतदान करताना आजच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, कॉंग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे, अपक्ष माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व वंचित आघाडीचे संजय सुखदान अशी चौरंगी लढत होती.

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी युतीच्या उमेदवारांचा प्रचार केल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात व विखे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. या मतदारसंघातील 1 हजार 710 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. सुरवातीच्या दोन तासात 7.31 टक्‍के मतदान झाले. बहुतांशी मतदान केंद्रांवर सकाळी 10 वाजल्यापासून मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. त्यामुळे सकाळी 11 वाजता 20.57 टक्‍के मतदान झाले होते. दुपारी 3 वाजेपर्यंत 45.43 टक्‍के मतदान झाले होते.

या मतदानाच्या आकडेवारीत अकोले तालुका आघाडीवर होता. दुपारी 3 वाजेपर्यंत 46.93 टक्‍के मतदान झाले होते. संगमनेर 45.39, शिर्डी 45.67, कोपरगाव 45.77, श्रीरामपूर 46.12, नेवासे 42.43 अशा प्रकारे मतदान झाले होते. दुपारी चारनंतर उन्ह कमी झाल्याने मतदान वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. उलट मतदान कमी होत गेले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 56.1 टक्‍के मतदान झाले होते. पुढील एक तासात अवघे 6 टक्‍के मतदान वाढले आहे. अर्थात रात्री उशिरापर्यंत साडेसात वाजेपर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते.

गेल्या निवडणुकीत 64 टक्‍के मतदान झाले होते. त्यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघापेक्षा 2 टक्‍क्‍यांनी या मतदारसंघाने आघाडी घेतली होती. यावेळी मात्र नगरने आघाडी घेतली असून शिर्डी मात्र दोन टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. त्यामुळे याचा फटका कोणाला बसणार याबाबत उत्सुकता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.