अहिल्यानगर : शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेती करण्यास आणि नैसर्गिक शेतीचा आवाका वाढविण्यास उपयुक्त असणाऱ्या केंद्र शासनाच्या ‘नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग’ योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष नवले, कृषी उपसंचालक सागर गायकवाड, प्रकल्प उपसंचालक राजकुमार मोरे, विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दिक्षित आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनामार्फत ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी १३ कोटी ८७ लाख रुपयाच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यातील शेतकरी हे प्रयोगशिल आहेत. फळे, भाजीपाला व फुलपिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. इतर पिकांच्या तुलनेत फलोत्पादन पिके शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या जास्त उत्पन्न मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावतात. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मान्यता देण्यात आलेल्या १४ कोटी रुपये निधीच्या वापराद्वारे फलोत्पादन पिकाची मूल्यसाखळी बळकट करण्यासाठीचे अभियान प्रभावीपणे राबवावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिल्या. बैठकीचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व प्रकल्प संचालक प्रदीप लाटे यांनी केले.