श्रीगोंदा – आम्ही पोलीस आहोत गाडीत काय माल भरला आहे, अशी चौकशी करत रजिस्टरवर सही करण्याच्या बहाण्याने टेंपोमधील क्लीनर साईटच्या सीट खाली ठेवलेले 27 हजार 100 रुपये चोरून नेल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नगर- दौंड रस्त्यावर निमगाव खलू गावाजवळील शांताई लॉन्स नजीक घडली.
सदर घटनेबाबत ट्रकचालक लखन नायक (रा. बगवा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तीन अनोळखी इसमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज सदर टेंपोचलक हा नगर- दौंड रस्त्याने जात असताना बिगर नंबर प्लेटच्या अपाची दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमानी शांताई लॉन्स नजीक सदर टेंपो चालकाला दुचाकी आडवी लावत टेंपोमधील सीट खाली ठेवलेली 27,100 रुपये रोख रक्कम चोरुन नेली. टेंपोमध्ये चढल्यानंतर चालकाला पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर दिली.