अहिल्यानगर : शहरातील तारकपूर भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये गळती होऊन तीन गल्लींमध्ये पाणी साचले आहे. यामुळे घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांना रोज पाणी बाहेर काढण्याचे कष्ट करावे लागतात. घराच्या आतील भागात पाणी घुसल्याने नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
महापालिकेने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत, पाणीपट्टी आणि मालमत्ता करात १००% वाढ केली आहे. मात्र, त्याबदल्यात नागरिकांना किमान मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत. पाणी गळतीमुळे निर्माण झालेल्या या समस्याविरोधात नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या, पण महापालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
नगरसेवक योगीराज गाडे यांनी स्वतः तारकपूर भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. याप्रकरणावर त्वरित लक्ष देण्याचे निर्देश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांची समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले, “गेल्या ५-६ दिवसांपासून ही समस्या सुरू आहे. घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
महापालिकेने तातडीने या गळतीचे निराकरण करावे. मी याबाबत महापालिका प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नागरिकांची ही समस्या त्वरित सोडवली जावी, अशी अपेक्षा सर्वांमध्ये आहे. जर महापालिकेने यावर कार्यवाही केली नाही, तर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा दिला.