अहिल्यानगर : राज्य महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्व्हेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांचे वतीने स्वामित्व (SVAMITVA) योजनेची अमंलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला मालमत्ता पत्रक (Property Cards) उपलब्ध करून देताना संबंधित मिळकत धारकाला दस्तऐवजाचा हक्क (Record of Rights) प्रदान करत आहे. १८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ८८ गावांतील ७ हजार ५० मिळकतधारकांना प्रातिनिधिक स्वरुपात मालमत्तापत्रकचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेखचे प्रभारी जिल्हा अधीक्षक अविनाश मिसाळ यांनी दिली.
आतापर्यंत या योजनेतंर्गत जिल्ह्यातील गावांमधून ड्रोन सर्व्हेचे कामकाज भूमी अभिलेख विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेले असून, मालमत्ता पत्रक (Property Cards) तयार करण्यात महत्वाची प्रगती साध्य केलेली आहे. स्वामीत्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत मालमत्ता विषयक कागदपत्र उपलब्ध झाल्याने ग्रामीण क्षेत्रातील लोकांना सक्षम बनविले आहे. याचाच एक भाग म्हणून दि. १८ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान ५० लाख मालमत्ता पत्रकाचे आभासी वितरण करतांना लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या आभासी कार्यक्रमानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या स्थानिक कार्यक्रमामध्ये प्राॅपटी कार्डचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार आहे.
१८ जानेवारी रोजी पंडित जवाहरलाल नेहरु सभागृह, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान ५० लाख मालमत्ता पत्रकाचे आभासी वितरण करताना लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमास विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींसह अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानंतर जिल्ह्यातील ८८ गावांतील ७ हजार ५० मिळकतधारकांना प्राॅपटी कार्डचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात येणार आहे.