श्रीरामपूर : शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे विस्थापित व बेघर झालेल्या व्यावसायिक व नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे, तसेच श्रीरामपूर शहरातील रस्ते आणि विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, याबाबत माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी या सर्व प्रश्नांबाबत सकारात्मकता दर्शवली.
माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी मंत्रालय, मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांचे मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. श्रीरामपूर शहरातील रस्ते व विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ही मागणी केली.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेकडो कुटुंब बेघर झाली आहेत. अनेकांनी बँकांची कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेले होते.
अतिक्रमणे काढल्यामुळे त्यांची दुकाने निघाली आहेत. त्यामुळे अनेक व्यापारी व रहिवासी यांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी पालकमंत्री विखे पाटील हे देखील सकारात्मक आहेत. आपणही आपल्या स्तरावर सहकार्य करून विस्थापितांना न्याय द्यावा व श्रीरामपूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. या दोन्ही मागण्यांबाबत अजित पवारांनी सकारात्मकता दर्शवत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अश्या सूचना संबंधितांना केल्या.