Nagar-Daund Railway: नगर-दौंड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या (डबल लाईन) कामातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. या प्रकल्पांतर्गत दौंड ते काष्टी दरम्यानच्या १३ किमी अंतराच्या नवीन दुहेरी मार्गाची तांत्रिक चाचणी रविवारी (दि. २५) यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या प्रकल्पामुळे नगरकरांचा रेल्वे प्रवास आता अधिक वेगवान आणि विनाअडथळा होणार असून, रेल्वेचा वेग ताशी १२० किमीपर्यंत पोहोचणार आहे. सिंगल लाईनचा अडसर दूर होणार – गेल्या तीन वर्षांपासून मनमाड-नगर-दौंड या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मनमाड ते नगर दरम्यानचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून, आता नगर ते दौंड या दुसऱ्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत सिंगल लाईनमुळे अनेक गाड्यांना क्रॉसिंगसाठी तासोनतास एकाच जागी थांबून राहावे लागत होते. मात्र, आता दुहेरी मार्ग आणि संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे रेल्वे गाड्यांना विनाकारण थांबा घ्यावा लागणार नाही. रेल्वे धावणार १२० च्या वेगाने – रविवारी झालेल्या चाचणीत विशेष रेल्वे इंजिनच्या सहाय्याने या मार्गाची क्षमता आणि वेगाची तपासणी करण्यात आली. दुहेरीकरणामुळे गाड्यांचा वेग वाढून तो ताशी १२० किमीपर्यंत जाणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. नगर ते दौंड दरम्यानचे उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. Nagar-Daund Railway अधिकारी वर्गाची उपस्थिती – रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही चाचणी पार पडली. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी ए. के. पांडे, मुख्य अभियंता बी. के. सिंह, उपमुख्य अभियंता सागर चौधरी (बांधकाम), सहाय्यक कार्यकारी अभियंता राजनारायण सैनी यांच्यासह धर्मेंद्र कुमार, एस. के. सिंह, सुधांशू कुमार, आर. डी. सिंह, प्रगती पटेल, राकेश कुमार, परशुराम राठोड आणि धम्मरत्न संसारे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. “दौंड-काष्टी डबल लाईनच्या चौथ्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली असून, यात रेल्वेचा नेमका वेग तपासण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नगर जिल्ह्याच्या रेल्वे दळणवळणाला मोठी गती मिळेल आणि प्रवासाचा दर्जा सुधारेल.” — सागर चौधरी, उपमुख्य अभियंता (बांधकाम)