जामखेड : पोलिसांकडून कारमधील चार लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

जामखेड तालुक्‍यातील प्रकार : गॅरेज फोडणाऱ्या चोरट्यांचा मालकाकडून पाठलाग

जामखेड – गॅरेजमध्ये चोरी होत असल्याची माहिती मिळताच मालकाने गॅरेज गाठले. यावेळी मालकास पाहताच चोरटे कारमधून पळाले. मात्र गॅरेज मालकाने त्यांचा पाठलाग केला. काही अंतरावर जाताच चोरट्यांनी कार सोडून पोबारा केला. त्यानंतर गॅरेज मालकाने पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता कार, कॉम्प्युटरसह 4 लाख 90 हजार रुपयांचे साहित्य आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती की फिर्यादी जावेद मैनुद्दीन शेख (रा. नूरानी कॉलनी, जामखेड) हे नगररोडवरील दुकान बंद करून घरी गेले. पहाटे चारच्या सुमारास त्यांना त्यांच्या मित्राने तुमचे गॅरेज उघडे असून, समोर इंडिका कार उभी असल्याचे सांगितले. तेव्हा शेख गॅरेजकडे आले असता दुकानाचे शटर उघडे पाहून इंडिका कारमधील दोघांना हटकले. त्यांनी काही न बोलता कारसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेख यांनी त्यांचा मातकुळी येथील पाझर तलावापर्यंत पाठलाग केला. मात्र चोरांनी अंधाराचा फायदा कार सोडून पळ काढला. त्यानंतर शेख यांनी घडलेला प्रकार जामखेड पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी कारची (क्र. एमएच 12 बीव्ही- 7203) तपासणी केली असता, 80 हजारांचे कॉम्प्युटर, 40 हजारांचे एलएडी स्क्रीन, 35 हजारांचे स्कॉनिंग मशिन, 70 हजारांचे प्रिंटर मशीन, 11 हजारांचे यूपीएस मशीन, 40 हजारांचे की बोर्ड, 20 हजारांचे माऊस, 50 हजारांची पाण्याची मोटार, असे एकूण 1 लाख 33 हजार 200 रुपयांचे साहित्य, तसेच गॅरेजमधून चोरलेले एक लाख 30 हजारांचे टायर, 90 हजारांचे साऊंड, असा कारसह एकूण 4 लाख 90 हजार रुपयांचा माल आढळून आला. शेख यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारुती राजेंद्र जरे (रा. मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड) व एक अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.