जलयुक्तची कामे गांभीर्याने घ्या

जिल्हाधिकारी : जलयुक्त,मागेल त्याला शेततळे योजनांची आढावा बैठक

नगर  – राज्य शासनाचा पथदर्शी उपक्रम असणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानातील सन 2017-18 मधील उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज (मंगळवारी ) जलयुक्त शिवार अभियान तसेच मागेल त्याला शेततळे योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर भोर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ति जमदाडे-कोकाटे आदींची यावेळी उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी तालुकानिहाय जलयुक्त शिवार अभियानातील विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. काही ठिकाणी कामे पूर्ण होऊनही जिओ टॅगिंग झाले नसल्याने राज्य पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही. ज्या यंत्रणांनी संबंधित कामे केली असतील, त्या यंत्रणांचीच जिओ टॅगिंगची जबाबदारी आहे. त्यामुळे ही कामे गांभीर्याने घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. घ्या अन्यथा ती कामांसंदर्भातील अनियमितता मानण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सन 2017-18 साठी जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावांत काही कामे सुरु नसल्याचे दिसून आले आहे. त्यातील तांत्रिक अडचणींची तात्काळ पूर्तता करुन ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. डिसेंबरअखेरीस एकही काम अपूर्ण राहता कामा नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी विविध यंत्रणांना दिल्या.

जिल्ह्यात सन 2017-18 मध्ये 7 हजार 941 कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून 7 हजार 152 कामे पूर्ण झाली आहेत. या अभियानाची 704 कामे प्रगतीपथावर असून उर्वरित कामेही पूर्ण करण्याची सूचना द्विवेदी यांनी केली. सध्या या कामांवर 57 कोटी 22 लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

सन 2018-19 मध्ये निवडण्यात आलेल्या 249 गावांत 6 हजार 887 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त करुन संबंधित यंत्रणांनी कामास सुरुवात करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव तात्काळ दाखल करण्यासही त्यांनी सांगितले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह जलसंधारण, भूजल सर्वेक्षण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)