बेशिस्त रिक्षांमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा

रस्त्यांमध्ये झाला थांबा; माळीवाडा बसस्थानक झाले बकाल ; बससेवा बंदमुळे फावले

नगर – शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा सुळसुळाट झाला आहे. या रिक्षांच्या चालकांकडून वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे पालन होत नाही. रस्त्यात कोठेही रिक्षा उभ्या करणे, रस्त्याच्या मध्ये उभे राहून प्रवासी बसवणे, वाहनचालकांशी अरेरावी, असे प्रकार सातत्याने होत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यात शहर बससेवा बंद असल्याने रिक्षाशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे रिक्षाचालकांचे फावले असून मनमानी पद्धतीने प्रवाशांना वागणूक दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात माळीवाडा बसबस्थानकापासून दिल्ली गेट, पाइपलाइन रस्ता, एमआयडीसी, केडगाव या भागासाठी रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. माळीवाडा बसस्थानक परिसरात या रिक्षा उभ्या असतात. येथूनच प्रवासी घेऊन शहराच्या विविध भागात रिक्षा जातात. या रिक्षा मात्र वाहतुकीचे कोणतेही नियम पाळत नाहीत.

माळीवाडा बसस्थानकाबाहेरील परिसर तर पूर्णपणे बंदिस्त झाला आहे. येथून रस्ता शोधणे कठीण झाले आहे. याचे कारण म्हणजे रस्त्याच्या कडेला अतिक्रमणे असल्याने रस्ता आधीच अरुंद झाला आहे. त्यात पुन्हा या रिक्षा येथे उभ्या राहत असल्याने वाहनांना जाण्या-येण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही. येथून कसेबसे बाहेर पडल्यानंतर पुढे माळीवाडा वेशीजवळील चौकात या रिक्षा रस्ता अडवून उभ्या असतात.

या चौकात शहरातून येणाऱ्या वाहनांची गर्दी झालेली असते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीच्या समस्येची डोकेदुखी झाली आहे. यापुढे गेल्यानंतर मध्ये उतरणारे प्रवासी असतात. त्यामुळे या रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबत असल्या तरी वाहतुकीस अडथळा होतो. दिल्ली गेट भागात तर या रिक्षांचा त्रास प्रचंड वाढला आहे. या भागात हलक्‍या वाहनांची वर्दळ जास्त असते. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसही येथे असतात. तरीदेखील वाहतूक कोंडीची समस्या मात्र तसूभरही कमी झालेली नाही. येथेही रिक्षा रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असतात. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा विचार केला जात नसल्याने वाहतूक कोंडी होते.

एमआयडीसी, सावेडीकडे जाणाऱ्या रिक्षा सिव्हिल हॉस्पिटलसमोर अशाच पद्धतीने रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जाण्यास अडचणी निर्माण होतात. वाहनांच्या गराड्यातून त्यांना हॉस्पिटलध्ये जावे लागते.
शहरातील प्रेमदान चौक, लालटाकी, सावेडी नाका, प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक या ठिकाणीही अशीच स्थिती आहे. या रिक्षांसाठी कोणताही थांबा नाही. त्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. शहर बससेवा गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या रिक्षांतून प्रवास करणे प्रवाशांना भाग पडत आहे.

रिक्षांशिवाय पर्याय नसल्याने रिक्षा चालकांनी मनमानी सहन करावी लागत आहे. माळीवाडा बसस्थानकांवर रिक्षा चालकांनी एसटीबसला देखील मज्जाव केला आहे. एसटी स्थानकात जाण्यासाठी देखील मार्ग मिळत नाही. कारण प्रवेशद्वारासमोर रिक्षा उभा असतात. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोर वाहनांच्या रांगाच लागतात. एसटी बस पाहूनही रिक्षा चालक आपली रिक्षा हलवत नाही. एवढी मनमानी वाढली आहे.

पोलिसांची बघ्याची भूमिका

जिल्हा परिषदेच्या समोरच रिक्षा थांबा झाला आहे. त्यामुळे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना कार्यालयात प्रवेश करणे अवघड झाले आहे. रिक्षा माळीवाडा बसस्थानकासमोर उभ्या असल्यामुळे बसला आत प्रवेश करता येत नाही. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. परिणाम वाहतुक कोंडी होते. याबाबत जिल्हा परिषदेने पोलीस प्रशासनला पत्र देवून रिक्षा थांबा अन्यत्र हलविण्याची मागणी केली. तसेच रिक्षा चालकांना शिस्त लावा अशी विनंती केली. त्यानुसार या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली. पण पोलीस समोर असून रिक्षा चालक आपली मनमानी करीत आहे. त्यामुळे पोलीस आता हतबल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)