कर्ज घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर बॅंकेची आज वार्षिक सभा

आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार : बॅंकेच्या प्रशाकीय पातळीवरून सावरासावरी

नगर – शहर सहकारी बॅंकेमध्ये झालेल्या कर्ज घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. कर्ज घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. कर्ज घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे. या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शहर सहकारी बॅंकेतील कर्ज घोटाळ्यामुळे ठेवीदारांनी ठेवी काढून घेण्यास सुरूवात केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज दिवसभरात व्यापारी आणि सर्वसामान्यांनी ठेवी घेण्यासाठी शहर बॅंकेच्या विविध शाखांमध्ये गर्दी केली होतीय. डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्वला कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे यांनी बुधवारी रात्री कोतवाली पोलिसांकडे वेगवेगळ्या केलेल्या तक्रारीवरून तीन गुन्हे दाखल झाले आहेत. शहर बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अनासपुरे यांनी आज घाईघाईने प्रसिद्धपत्रक काढून बाजू मांडली. मालमत्तेची जप्ती टाळण्यासाठी वरिल तिन्ही तक्रारी खोट्या आहेत, असा दावा केला आहे.

बॅंकेचे अध्यक्ष, संचालक, बॅंक अधिकारी जवाहर कटारिया, दिनकर कुलकर्णी व कर्ज विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांनी डॉ. नीलेश शेळकेसोबत संगनमत करून बेकायदेशीर व नियमबाह्यपद्धतीने कर्ज प्रकरणे करून 17 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. डॉ. नीलेश विश्‍वास शेळके, मधुकर वाघमारे, योगेश मदनलाल मालपाणी, जगदीश कदम, आर. टी. कराचीवाला फर्मचे संचालक यांच्यासह बॅंकेचे संचालक अशोक कानडे, सुनील फळे, सुभाष चंदनमल गुंदेचा, सतीश दत्तात्रय अडगटला, मच्छिंद्र लक्ष्मण क्षेत्रे, गिरीष मुकुंद घैसास, विजयकुमार माणिकचंद भंडारी, सुजीत श्रीकांत बेडेकर, शिवाजी अशोकराव कदम, रेश्‍मा राजेश आठरे, निलीमा विश्‍वनाथ पोतदार, बाळासाहेब विठ्ठल राऊत, संजय प्रल्हाद मुळे, दिनकर यशवंत कुलकर्णी, जवाहर हस्तीमल कटारिया, बी. पी. भागवत यांच्यासह मुकुंद घैसास, रावसाहेब अनभुले व लक्ष्मण वाडेकर या मयत संचालकांचा देखील आरोपीत समावेश आहे.

कर्ज प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर फिर्यादी यांनी पुरावे गोळा करत उपनिबंधकांकडे तक्रार केली. त्याचबरोबर सहकार आयुक्तांकडे देखील तक्रार केली. या दोन्ही प्रशासकीय पातळीवर बॅंकेच्या कर्ज वितरणात घोटाळा झाला असल्याचे अधोरेखित केल्यावर तिन्ही डॉक्‍टरांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार केली. फिर्याद देताना या डॉक्‍टरांनी उपनिबंधकांनी ओढलेले ताशोरे आणि सहकार आयुक्तांकडे केलेल्या तक्राराची दखल घेतल्याचे पुरावे देखील जोडले आहेत. त्यामुळे या गुन्ह्याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

शहर बॅंकेने प्रशासकीय पातळीवरून पत्रक प्रसिद्ध केले आहे. कर्ज अर्जासोबत मशिनरींचे कोटेशन दाखल केलेले होते. त्यानुसार छाननी करून कर्ज वितरण केले आहे. कोटेशन किंमतीच्या 70 टक्के कर्ज मंजूर केले आहे. कर्जास तराण म्हणून मिळकतीचे रजिस्ट्रर्ड गहाणखत दुय्यम निबंधक यांचेसमोर प्रत्यक्ष हजर राहून लिहून नोंदवून दिले आहे. कर्ज वसुलीसाठी बॅंकेने वेळोवेळी नोटिसा बजविल्या आहेत.

बॅंकेवर व संचालकांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने ही खोटी व बनावट फिर्याद दिलेली आहे. फिर्यादीमुळे कोणाही दिशाभूल करून घेऊ नये, असे आवाहन केले आहे. या कर्ज घोटाळ्यामुळे नगर शहरासह बॅंकिंग क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर बॅंकेची उद्या शुक्रवारी माऊली सभागृहात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

“कर्ज रकमेच्या वसुलीसाठी सहकार न्यायालयात कर्जदार व जामिनदारांविरोधात लवाद दावा दाखल केला आहे. कर्जास तारण असलेल्या कर्जदार व जामिनदार यांच्या सुमारे 105 पेक्षा जास्त मिळकतींवर दावा दाखल केला आहे. न्यायालयातही अशाच प्रकारच्या तक्रारी आहेत. न्यायालयाने कागदपत्रांची शहानिशा करून गुणदोषांवर या मिळकती जप्त करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे बॅंकेवर व संचालकांवर दबाव आणण्यासाठी ही खोटी फिर्याद दिली आहे.
– संतोष अनासपुरे , मुख्य कार्यकारी अधिकारी

“बॅंकेच्या या कर्ज घोटाळ्यासंदर्भात आम्हीच पहिली तक्रार सहकार आयुक्तांकडे केली होती. यानंतर बॅंके प्रशासन व संचालक जागे झाले आणि सहकार न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात या दाव्यावर कोणत्याही सुनावणी झालेली नाही. त्यामुळे मिळकती हस्तांतराची किंवा ताब्या घेण्याच्या सूचनेचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. घोटाळा झाकण्यासाठी आणि ठेवीदारांची दिशाभूल करण्यासाठी बॅंक प्रशासकीय पातळीवर चुकीची माहिती प्रसिद्धीला देत आहे. – फिर्यादी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)