राजूरमध्ये पोलिसांवर दगडफेक, तणाव

हाणामारीचे 50 जणांवर गुन्हे; सहा जण अटकेत

अकोले – तालुक्‍यातील राजूर गावात गणपती विसर्जन मिरवणुकीत फटाके वाजवण्याच्या कारणावरून रविवारी दोन गटांत तुफान हाणामाऱ्या झाल्या. आवाहन करणाऱ्या पोलिसांवरच जमावातील काही तरुणांनी थेट दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. या प्रकरणी दोन्ही गटांतील 50 जणांवर राजूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून सहा जणांना अटक केली आहे. तणावपूर्ण वातावरण पाहून राजूर गावात अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेश विसर्जन मिरवणुकीत गुरूदत्त मित्र मंडळ आणि छत्रपती तरुण मित्र मंडळ या दोन मंडळांच्या मिरवणुका स्टेट बॅंकेसमोर आल्या असता एक मंडळाने फटाके वाजविले. त्या कारणावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर तुफान हाणामारीत झाले. दरम्यान, छत्रपती तरुण मित्र मंडळाच्या बॅंड पथकावर काही तरुणांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही मंडळांच्या मिरवणुका बंद करण्यात केल्या. घटनास्थळी जमाव मोठ्या संख्येने जमला होता. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण बनले होते.

राजूरमधील तणावाची माहिती संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे व संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना पोलीस फौजफाट्यासह राजूरला पाठविले. काही पोलिसांना धक्काबुक्की झाली. दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातून धूम ठोकली. रात्री दीड वाजता राजूर पोलिसांनी गणपतीची आरती करुन विधिवत विसर्जन केले.

पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हरिभाऊ कानकाटे, संतोष हरिभाऊ कानकाटे, किरण हरिभाऊ कानकाटे, नंदू हरिभाऊ कानकाटे, प्रशांत कानकाटे, जीवन चोथवे, सतीश कानकाटे, राधुजी भडांगे, सोमा मुर्तडक, विनायक उत्तम चोथवे, किरण वराडे, प्रतीक येलमामे, विनायक लहामगे, अक्षय राजू कानकाटे, श्रीकांत अशोक कानकाटे यांच्यासह 40 ते 50 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राजू हरिभाऊ कानकाटे, पंकज हरिभाऊ मुर्तडक, विनायक चोथवे, अक्षय राजू कानकाटे, श्रीकांत अशोक कानकाटे, पंकज हरिभाऊ कानकाटे या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या हाणामाऱ्यात राजू कानकाटे, नंदू कानकाटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दगडफेकीने वातावरण तापले

राजूर येथे झालेल्या हाणामाऱ्याचे प्रकरण सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून मिटवले होते; परंतु मिरवणुकी दरम्यान कार्यकर्त्यांनी जमाव पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले. पोलिसांवर दगडफेकी दरम्यान एक व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे. यावरून आरोपींची धरपकड करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)