शिर्डी : येथील चारी नंबर १२ लगत असलेल्या अतिक्रमणांवर जलसंपदा, महसूल, नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त कारवाईची मोहीम राबवत शासकीय जागेत गेल्या अनेक वर्षापासून असलेले पक्के बांधकाम, हॉटेल, आश्रम व पत्र्याचे शेड जमीनदोस्त केले आहे. आणखीन काही दिवस शिर्डी शहरात चारी नंबर १२ वरील तसेच लगत असलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रशासनाकडून सुरूच राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिली.
शिर्डी शहरातील जलसंपदा विभागाच्या चारी नंबर १२ वर व लगत सन २००४ पासून शासकीय जागेत येथील शेकडो व्यावसायिकांनी पत्र्याचे शेड टाकून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू केले होते. या जागेवर हॉटेल, पक्के घरे तसेच एक आश्रम देखील असल्याने शेतीकरिता शेतकऱ्यांना ७ नंबर मागणी अर्जावर शेतीसाठी पुरेशा दाबाने गोदावरी कालव्यातून पाणी मिळत नसल्याने लाभधारक शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून जलसंपदा विभागाला सातत्याने तक्रारी केल्या होत्या. तसेच या ठिकाणी अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला अनेकदा केल्या होत्या.
शिर्डीत मोठ्या प्रमाणे वाढत असलेली गुन्हेगारी व जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शासकीय जागेत असलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रशासनान सुरू केल्याने याचाच एक भाग म्हणून शिर्डीत शासकीय जागेत असलेले सर्वच अतिक्रमण काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दि. १३ फेब्रुवारीपासून सकाळी चारी नंबर १२ वरील सर्वच अतिक्रमण प्रशासनाने हटवण्याचा निर्णय घेतला. गुरुवार व शुक्रवारी सुरू असलेल्या या मोहिमेत जवळपास १०० पेक्षा जास्त पत्र्याचे शेड, २५ पक्के बांधकाम, एक आश्रम प्रशासनाने या मोहिमेत उद्धध्वस्त केला.
या शासकीय जागेवर असणारे सर्वच अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रशासन सुरूच ठेवणार असून, शिर्डीतील विविध ठिकाणी असलेल्या शासकीय जागेवरचे अतिक्रमण देखील लवकरच काढण्यात येणार असल्याचे समजते. शिर्डीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेली गुन्हेगारी तसेच शासकीय जागेवर सुरू असलेले अवैध व्यवसाय ही शहरातील नागरिकांना डोकेदुखी झाली असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नागरिकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ.सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना यावर मार्ग काढावा, अशी विनंती केली. डॉ सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील सर्वच ठिकाणी सुरू असलेले अवैध व्यवसाय तसेच शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या निर्णयाचे शिर्डीतील नागरिकांनी स्वागत केले आहे.
अतिक्रमण मोहिमेत जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अधिकारी शहाणे, पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे व विविध शासकीय विभागाचे कर्मचारी व पोलीस यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे.