नगर – नगर जिल्ह्यात करोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे येत असल्याने जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयातील 80 टक्के बेड आता कोविडसाठी राखीव करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्याबाबत केंद्रीय आरोग्य पथकाने कालच सूचना केली होती. त्यानुसार लवकरच महानगर पालिका आयुक्त आदेश काढणार असल्याचे समजते.
केंद्रीय आरोग्य पथकाने काल नगर जिल्ह्यातील करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या आठ दिवसांपासून सरासरी दररोज दोन हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची बेड मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात सुमारे चारशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य पथकाने काल नगर शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात पाहणी करून कोविडचा आढावा घेतला. करोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य प्रशासनाला जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड कोविडसाठी राखीव करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार जिल्हाधिकारी व आरोग्य अधिकार्यांनी चाचपणी सुरू केली आहे. तर, महापालिकेच्या हद्दीतील खासगी रुग्णालयांची चाचपणी करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आहेत. त्यावर कार्यवाही सुरू असून, येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड कोविडसाठी राखीव करण्यात येणार आहेत. त्याबात आयुक्त व सर्व नगर परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सूचना दिल्याचे सूत्रांकडून समजले.
दरम्यान, करोनाच्या गंभीर रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. त्यांना तत्काळ बेड उपलब्ध करून दिले जात आहे. जिल्ह्यात आयसीयू 727, ऑक्सिजन 2 हजार 463, व्हेटिलेटर 340 अशी बेडची अवस्था आहे. याशिवाय करोनाची मध्यम लक्षणे असेलेले आणि कोविड सेंटरचे बेड वेगळे आहेत. आणखी जास्ती जास्त बेड कसे उपलब्ध होतील. याबाबत जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यातील बेडची सद्यास्थिती
-आयसीयू : 727
-ऑक्सिजन : 2,463
-व्हेटिलेटर : 340
करोनाची सौम्य लक्षणे
-ग्रामीण भागात : 3,656
-महानगरपालिका : 1,022
-जिल्ह्यातील एकूण : 4,678
कोविड सेंटरमधील बेड
ग्रामीण व मनपा हद्दीत : 7299
दोनशे ऑक्सिजन बेड मिळणार
विदळ मेडिकल कॉलेजचे ऑक्सिजनचे 200 बेड जिल्हा प्रशासनाला मिळणार आहेत. त्यामुळे आणखी दोनशे बेडची भर पडणार आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाची मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाशी चर्चा झाली आहे. सोमवारपर्यंत बेड मिळण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.